नवी दिल्ली/बीजिंग – लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्रातून चीनच्या लष्कराने माघार घेतल्यानंतर, उभय देशांच्या लष्करी अधिकार्यांमध्ये चर्चेची दहावी फेरी सुरू होईल. शनिवारपासून सुरू होणार्या या चर्चेत लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी इतर उपाययोजनांवर विचार केला जाईल. मात्र या चर्चेपेक्षाही चीनने गलवान खोर्यातील संघर्षात आपले पाच अधिकारी व जवान ठार झाल्याची दिलेली कबुली माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून गलवान खोर्यातील संघर्षात चीनने 45 जवान गमावल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असून भारताच्या लष्करी अधिकार्यांकडूनही याला दुजोरा दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनला ही कबुली द्यावी लागल्याचे बोलले जाते.
गलवानच्या संघर्षात भारतीय लष्कराचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 सैनिक शहीद झाले होते. त्यांचा पराक्रम व बलिदानाचे देशाला कधीही विस्मरण होणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत म्हटले होेते. या शहिदांचे स्मारकही उभारले जात आहे. मात्र चीनने आत्तापर्यंत गलवानच्या संघर्षात मारल्या गेलेल्या आपल्या अधिकारी व जवानांची माहिती दडवून ठेवली होती. यावर चीनच्या सोशल मीडियावर काहीजणांची संताप व्यक्त केला होता. या संघर्षात चीनने 45 जवान गमावल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला होता. भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी रशियन माध्यमांच्या या दाव्याला दुजोरा देणारी विधाने केली होती. गलवानमधील संघर्षानंतर 60 चिनी जवानांना स्ट्रेचरवरून नेण्यात आले होते.
मात्र त्यांच्या जखमा किती गंभीर होत्या, त्याची आपल्याला कल्पना नसल्याचे ले. जनरल जोशी यांनी म्हटले होते. भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली होती. त्यानंतर दडपण वाढलेल्या चीनला गलवानच्या संघर्षात आपले पाच अधिकारी व जवान ठार झाल्याचे मान्य करावेच लागले. त्यांची नावे देखील चीनने उघड केली. मात्र चीन याबाबत अर्धसत्य सांगत असून ठार झालेल्या चिनी अधिकारी व जवानांची संख्या याहूनही कितीतरी अधिक असल्याचे खात्रीलायक दावे रशियन तसेच अमेरिकन माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत.
दरम्यान, याबाबतचा व्हिडिओ देखील चीनने प्रसिद्ध केला आहे. याद्वारे भारतीय सैनिकांनीच चिनी जवानांवर हल्ला चढविल्याचा आरोप करून चीनने या संघर्षाला भारत कारणीभूत असल्याचा दावा केला. परदेशी लष्कराने घुसखोरी करून चीनच्या अधिकारी व जवानांचा बळी घेतल्याचे दावे चिनी लष्कराने केले आहे. थेट भारताचा उल्लेख टाळून चिनी लष्कराने दोन्ही देशांमध्ये तेढ वाढविली नाही, अशी प्रशंसा चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केली. याआधीही चीनने गलावनच्या खोर्यात ठार झालेल्या आपल्या जवानांची माहिती उघड करण्याचे टाळताना, यामुळे दोन्ही देशांमधील वैमनस्य वाढेल, असे म्हटले होते.
मात्र भारताच्या लष्करी अधिकार्यांनी व माध्यमांनी गलवानमधील संघर्षाची माहिती उघड केल्याने, चीनला आपलेही जवान यात ठार झाल्याचे मान्य करावे लागल्याचे दिसते. गेल्या कित्येक वर्षात चीनने कुठल्याही संघर्षात आपला जवान गमावलेला नव्हता. म्हणूनच भारताबरोबरील संघर्षात ही हानी स्वीकारावी लागली आणि या क्षेत्रातून चीनच्या लष्कराला माघारही घ्यावी लागली आहे, ही बाब भारताचे लष्करी सामर्थ्य सिद्ध करणारी ठरते. पाश्चिमात्य माध्यमांनीही ही बाब मान्य केली होती. लडाखच्या कडक हिवाळ्यात चीनच्या लष्कराला टिकाव धरता आला नाही, ही बाब देखील जगजाहीर झाली आहे. प्रचंड लष्करी सामर्थ्य असलेला बलाढ्य देश या चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला यामुळे फार मोठा धक्का बसलेला आहे. त्यातच लडाखच्या एलएसी तसेच गलवान खोर्यातील संघर्षाची माहिती दडवून ठेवणार्या चीनची विश्वासार्हता धुळीला मिळालेली आहे.
अशा परिस्थितीत चीन आपली बाजू सावरण्यासाठी धडपडत आहे. गलवानच्या संघर्षात ठार?झालेल्या आपल्या अधिकारी व जवानांची संख्या अवघी पाच इतकीच असल्याचे सांगणारा चीन पुढच्या काळात या संघर्षात आपले याहून अधिक जवान ठार झाल्याचे मान्य करील, असे टोले भारतीय नेटकर सोशल मीडियावर मारत आहेत. त्याचवेळी चीनची लडाखमधील माघार या देशावर विसंबून असलेल्या पाकिस्तानसाठी धक्कादायक असल्याचे दिसू लागले आहे. पाकिस्तानातील चीनच्या राजदूतांनी लडाखमधील या सैन्यमाघारीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. चीनने लडाखच्या एलएसीवरून माघार घेतल्यानंतर, भारत पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष केंद्रीत करील, अशी चिंता पाकिस्तानला वाटू लागली आहे. त्यामुळे चीनचे राजदूत व पाकिस्तानी लष्करप्रमुखांमध्ये झालेली चर्चा लक्षवेधी ठरते.