बीजिंग/नवी दिल्ली – चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई गेल्या आठवड्यात भारताच्या दौर्यावर आलेले असताना, भारताने त्यांच्या या दौर्याला फारसे महत्त्व दिले नव्हते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वँग ई यांच्याबरोबरील हस्तांदोलनाचे फोटोग्राफ्स देखील माध्यमांना मिळाले नव्हते. दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील टाळण्यात आली. लडाखच्या एलएसीवरील चीनची हटवादी भूमिका आणि परराष्ट्रमंत्री वँग ई यांची काश्मीरच्या मुद्यावरील भारतविरोधी विधाने, यामुळे भारताने चीनला हा कोरडा प्रतिसाद दिल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. असे असूनही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या देशातील माध्यमांना निराळीच माहिती दिली.
‘भारत व चीन हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून भागीदार आहेत. दोन्ही देशांनी परस्परांना मागे खेचण्याऐवजी पुढे जाण्यासाठी तसेच यशासाठी सहाय्य करायला हवे. दोन्ही देश प्रगल्भ व तर्कसंगत विचार असणारे शेजारी देश आहेत. उभय देशांनी द्विपक्षीय संबंधांचा विचार करताना सीमावादामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होणार नाही किंवा त्यात अडथळे येणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी भारतातील भेटीबाबतची आपली भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी, भारत व चीन या दोन्ही देशांना परस्परांचा धोका राहिलेला नसून ही बाब दोन्ही बाजूंनी एकमताने मान्य केल्याचा दावाही केला. दोन्ही देशांना विकासाच्या संधी असल्याचे संबंधित देशांच्या नेतृत्त्वाने म्हटले असून वादांवर व्यवहार्य तोडगा काढण्यात येईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. भारत दौर्यातून काहीच हाती लागले नसतानाही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लावलेला हा नरमाई व सामंजस्याचा सूर बरेच काही सांगून जात आहे.
अमेरिकेने युक्रेनमध्ये सैन्य घुसविणार्या रशियावर अतिशय कठोर निर्बंध लादले आहेत. याचा फटका रशियन अर्थव्यवस्थेबरोबरच, रशियाशी व्यवहार करणार्या इतर देशांनाही बसू शकतो. चीन हा रशियाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. त्यामुळे रशियाबरोबर व्यापारी सहकार्य असलेल्या चिनी कंपन्यांनाही लक्ष्य करण्याची धमकी अमेरिका देत आहे. यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग विचलित झाल्याचे दावे केले जातात. मात्र काही झाले तरी रशियाबरोबरील सहकार्य गोठीत करण्याचा निर्णय चीन घेऊ शकत नाही. त्याचवेळी अमेरिकेच्या निर्बंधांकडेही चीनला दुर्लक्ष करता येणार नाही. यामुळे अमेरिकेत चीनकडून केली जाणारी अब्जावधी डॉलर्सची निर्यात बाधित होऊ शकते.
अशा परिस्थितीत भारतासारख्या प्रमुख देशाबरोबर सहकार्य कायम ठेवणे हे आर्थिक व राजकीयदृष्ट्या चीनसाठी अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यातच अमेरिकेने केलेल्या आवाहनानुसार रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचे साफ नाकारून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्र आहे, याची जाणीव सार्या जगाला करून दिली. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. काही देशांवर भारताच्या या भूमिकाचा प्रभाव पडला असून त्यांनीही युक्रेनच्या प्रश्नावर रशियाच्या विरोधात जाण्याचे नाकारले आहे. चीनलाही याची दखल घेण्यास भाग पडले.
भारताच्या विरोधात सतत विषारी प्रचार करणारी चीनची सरकारी माध्यमे देखील युक्रेनच्या मुद्यावर भारताने स्वीकारलेली भूमिका स्वतंत्र परराष्ट्र धोरण दाखवून देणारी असल्याची प्रशंसा करीत आहेत. तसेच भारताने असेच धोरण कायम ठेवावे, अशी अपेक्षा चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राने व्यक्त केली आहे.