बीजिंग/मॉस्को – युरोपिय महासंघ रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी घालत असतानाच जगातील इतर देशांनी रशियाकडून विक्रमी आयात सुरू केल्याचे समोर येत आहे. रशियाचा प्रमुख व्यापारी भागीदार देश असणाऱ्या चीनने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. चीनने मे महिन्यात रशियाकडून प्रतिदिन 20 लाख बॅरल्स तेलाची आयात केल्याचे उघड झाले. त्यामुळे रशियाने सौदी अरेबियालाही मागे टाकल्याचे सांगण्यात येते.
जून महिन्याच्या सुरुवातीला युरोपिय महासंघाने रशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी टाकण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे रशियन इंधनक्षेत्र व अर्थव्यवस्था अडचणीत येईल, असे दावे युरोपिय महासंघाकडून करण्यात येत होते. प्रत्यक्षात रशियन इंधनक्षेत्र पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाने मे महिन्यात दरदिवशी एक कोटी दोन लाख बॅरल्स तेलाचे उत्पादन सुरू केल्याची तसेच निर्यातील 13 टक्क्यांची भर पडल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली होती.
या वाढीमागे चीन व भारत या दोन देशांचा प्रमुख वाटा आहे. चीनने गेल्या वर्षीच्या तुलनेत रशियाकडून 55 टक्के कच्चे तेल जास्त आयात केल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. कोरोनामुळे चीनमध्ये मागणी कमी झाली असतानाही तेलाची आयात वाढविल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. वाढीव आयातीत ईस्ट सैबेरिया इंधनवाहिनीतून येणारे तेल व जहाजातून येणारे साठे अशा दोन्हींचा समावेश आहे. रशिया आपले कच्चे तेल सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत असल्याचे त्याचा फायदा उचलण्यासाठी चीनने आयात वाढविल्याचा दावा विश्लेषकांनी केला.