लंडन – चीन लवकरच अंतराळात ‘मेगाकॉन्स्टीलेशन’ अर्थात सॅटेलाईट्स प्रक्षेपित करणार आहे. किमान १३ हजार सॅटेलाईट्स पृथ्वीजवळील भ्रमण कक्षेत सोडण्याची तयारी चीन करीत आहे. ‘फाईव्ह जी’ मोबाईल इंटरनेट नेटवर्क मजबूत करण्यासाठी हे प्रक्षेपण केले जात असल्याची माहिती संबंधित चिनी कंपनीने दिली. पण एवढ्या मोठ्या संख्येने सॅटेलाईट्स सोडून चीन यांचा वापर हेरगिरीसाठी करू शकतो, असा आरोप पाश्चिमात्य देश करीत आहेत.
ब्रिटनच्या दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच चीन १३ हजार सॅटेलाईट्सचा तांडा प्रक्षेपित करणार आहे. चीनच्या चॉंगकिंग शहरात या सॅटेलाईट्सवर काम सुरू आहे. यावर चीनची ‘स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सायन्स, टेक्नोलॉजी अँड इंडस्ट्री फॉर नॅशनल डिफेन्स-एसएएसटीआयएनडी’ काम करीत आहे. हे सॅटेलाईट्स कशाप्रकारे काम करतील, यासंबंधी कोणतीही ठोस माहिती चीनने प्रसिद्ध केलेली नाही. पण संपर्क यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटची सेवा पुरविण्यासाठी या सॅटेलाईट्सचा वापर होईल, असा दावा या कंपनीने केला.
पृथ्वीजवळील भ्रमण कक्षेत वर्चस्व प्रस्थापित करणे, हे या प्रक्षेपणामागील मुख्य ध्येय असल्याचे या कंपनीने सांगितले. या सॅटेलाईट्समुळे इंटरनेट सुविधा सुधारेल व त्याचबरोबर पृथ्वीवरील हालचाली टिपण्यात सहाय्य मिळेल, असा दावा या कंपनीने केला. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स-स्टारलिंक’ कंपनीप्रमाणे चीन देखील हजारो सॅटेलाईट्सचे जाळे उभारीत असल्याचे दिसत आहे. मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने अंतराळात ४२ हजार सॅटेलाईट्सचे प्रक्षेपण करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी स्पेसएक्सच्या रॉकेट्समधून ठराविक बॅचमध्ये हे सॅटेलाईट् प्रक्षेपित केले जात आहे. या सॅटेलाईट्सच्या माध्यमातून पृथ्वीवरील इंटरनेट सेवा अधिक वेगवान होईल, असा दावा मस्क करीत आहेत. पण स्टारलिंकच्या या कार्यक्रमामुळे अंतराळातील सॅटेलाईट्सचा कचरा वाढेल आणि येत्या काळात अंतराळातील इतर सॅटेलाईट्सची सुरक्षा धोक्यात येईल, अशी टीका होत आहे.
चीन देखील हजारोंच्या संख्येने सॅटेलाईट्सचे प्रक्षेपण करून एलॉन मस्क यांच्या कंपनीला स्पर्धा देत असल्याचे बोलले जाते. पण चीन सांगत असला तरी या सॅटेलाईट्सचा वापर इंटरनेट नेटवर्कपेक्षाही हेरगिरीसाठी केला जाऊ शकतो, अशी चिंता पाश्चिमात्य देश व्यक्त करीत आहेत. याआधीही पाश्चिमात्य देशांनी चीनच्या सॅटेलाईट्सच्या वापरावर अशीच चिंता व्यक्त केली होती, याकडे ब्रिटनच्या दैनिकाने लक्ष वेधले. चीन अंतराळातील आपल्या सॅटेलाईट्सचा वापर शस्त्रासारखा करीत असल्याचे आरोप फार आधीपासून करण्यात येत होते.