तैपेई – अंतराळात भ्रमण करीत असलेल्या अमेरिकेच्या संवेदनशील उपग्रहांना भेदणार्या अत्युच्च शक्तिशाली लेझरची निर्मिती चीनने केली आहे. चीनच्या संशोधकांनी तयार केलेली ही यंत्रणा पाच मेगावॅट लहरींचा स्फोट घडवून अमेरिकेचे उपग्रह निकामी किंवा नष्ट करू शकेल. हॉंगकॉंग स्थित एशिया टाईम्स या वृत्तसंस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली.
चीनच्या संशोधकांनी ‘रिलेटीव्हीस्टिक क्लिस्ट्रोन एम्प्लिफायर-आरकेए’ ही मायक्रोवेव्ह यंत्रणा तयार केली आहे. चीनच्या शिचुआन प्रांतातील संशोधकांनी केए-बँडचा वापर करून पाच मेगावॅट ऊर्जालहरी उत्सर्जित करणारी लेझर यंत्रणा विकसित केली आहे. केए-बँड हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधील एक भाग असून नागरी तसेच लष्करासाठी याचा वापर केला जातो. लष्करामध्ये केए-बँडचा वापर शत्रूची यंत्रणा बाधित करण्यासाठी तसेच हेरगिरीसाठीही केला जातो.
चिनी संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मेगावॅट क्षमतेच्या आरकेएमधून अंतराळातील उपग्रह निकामी अथवा नष्ट करता येऊ शकतात. या लेझर यंत्रणेचा वापर जमिनीवरुन अंतराळातील उपग्रह भेदण्यासाठी होऊ शकत नाही. तर अंतराळातच एका उपग्रह वरून दुसर्या उपग्रहावर हल्ला चढवण्यासाठी या लेझरचा वापर केला जाऊ शकतो. इतकेच नाही तर अमेरिकेच्या ड्रोनसाठी देखील ही लेझर यंत्रणा मारक ठरू शकते, असा इशारा या वृत्तसंस्थेने दिला.
या लेझर यंत्रणेमध्ये पाच मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जालहरींचा समावेश असल्यामुळे जमिनीवरून अंतराळातील उपग्रह भेदणे सध्या शक्य नाही. पण एक गिगावॅट क्षमतेची लेझर यंत्रणा सहजरित्या अंतराळातील उपग्रह भेदू शकतात, असा दावा या वृत्तसंस्थेने केला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेतून निर्मिती झालेल्या या लेझरचा समावेश ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन्स-डिईड्ब्ल्यू’ या प्रकारात केला जातो. पण आरकेए ही यंत्रणा डिईडब्ल्यूमध्ये मोडत नसल्याचा दावा चीन करीत आहे.
पण तैवानची माध्यमे व अमेरिकेतील लष्करी विश्लेषक गेल्या काही महिन्यांमध्ये चीनने केलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चीनने अण्वस्त्रवाहू ‘हायपरसोनिक ग्लाईड व्हिकल’ची चाचणी घेतली होती. चीनच्या या हायपरसोनिक ग्लाईड व्हिकलने पृथ्वीच्या वातावरणीय कक्षेपर्यंत धडक दिली होती. सदर हायपरसोनिक ग्लाईड व्हिकल चीनची सॅटेलाईटभेदी लेझर यंत्रणा वाहून नेणारे ठरू शकतात, असा दावा तैवानच्या संकेतस्थळाने केला.
चीनने अंतराळाचे लष्करीकरण सुरू केले असून त्याचा सर्वात मोठा धोका अमेरिकेला असल्याचे ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिज्-सीएसआयएस’ या अमेरिकास्थित अभ्यासगटाचे वरिष्ठ विश्लेषक थॉमस कॅराको यांनी बजावले आहे. त्याचबरोबर सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष अंतराळातील संघर्षाचीच सुरुवात करील, अशी चिंता कॅराको यांनी व्यक्त केली. यामुळे इतर देशांचे उपग्रह यामुळे असुरक्षित बनतील, असा दावा कॅराको यांनी केला आहे.