चीन एलएसीवर अधिकच आक्रमक बनला आहे

- भारतीय विश्‍लेषकांचा इशारा

आक्रमकनवी दिल्ली/वॉशिंग्टन – एलएसीवर चीनच्या विरोधात भारताने स्वीकारलेली आक्रमक भूमिका सहन न झाल्याने चीन आपण भारताला धडा शिकविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत देत आहे. यासाठी चीनने एलएसीवरील लष्करी तैनाती प्रचंड प्रमाणात वाढविली आहेच. सोबत भारतीय हॅकर्सचा गट आपल्यावर सायबर हल्ले चढवित असून याला भारत सरकारचा पाठिंबा असल्याचे आरोप चीनच्या सोशल मीडियावरून केले जात आहेत. मुत्सद्दी आणि माजी राजनैतिक अधिकारी चीनच्या या हालचालींवर गंभीर चिंता व्यक्त करीत आहेत.

निक्केई एशिया या जपानच्या वृत्तसंस्थेने चीन एलएसीवर भारताच्या विरोधात करीत असलेल्या लष्करी तैनातीकडे लक्ष वेधले. या वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या लेखात भारतीय विश्‍लेषक ब्रह्मा चेलानी यांनी लडाख व अरुणाचल प्रदेशमध्ये चीन गेल्या काही वर्षांपासून करीत असलेल्या घुसखोरीचा दाखला दिला. अलीकडच्या काळात चीनने या घुसखोरीची तीव्रता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक हालचाली सुरू केल्या आहेत. इतकेच नाही तर इथल्या भूभागावर आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी चीन भारताशी लष्करी संघर्ष करू शकेल, असा संदेश चीनची सरकारी माध्यमे देत आहेत. एलएसीजवळील भागात गाव वसवून चीन इथल्या लष्करीकरणाला वेग देत आहे.

विशेषतः अरुणाचल प्रदेशजवळील एलएसीवर चीन अधिकाधिक आक्रमक बनत चालला आहे, याकडे सदर लेखात लक्ष वेधण्यात आले. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनने भारत व चीनमधील एलएसीवरील वाढलेल्या तणावाची नोेंद घेतली होती. इथला तणाव ही केवळ भारत व चीनपुरती मर्यादित राहणारी बाब नाही. कारण या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाची झळ सार्‍या जगाला बसू शकते. अमेरिकेचेही हितसंबंध यात गुंतलेले आहेत, असे भारताच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. आधीच चीनने भारताचे सुमारे ४३ हजार एकर इतके क्षेत्र बळकावलेले आहे. तसेच भारताबरोबरची एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजे आम्ही सांगू तीच सीमा असल्याचे दावे चीन ठोकत आहे. म्हणूनच अरुणाचल प्रदेशच्या एलएसीपासून पाच ते सहा किलोमीटर इतक्या अंतरावर चीन वसवत असलेले गाव ही फार मोठ्या चिंतेची बाब ठरते, असे विश्‍लेषक सांगत आहेत.

गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवरील गलवानमध्ये भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेल्या संघर्षानंतर, चीनच्या आक्रमकतेत वाढ झाली. या संघर्षात भारतीय सैन्याने चीनच्या लष्करी सामर्थ्याची घमेंड चांगलीच जिरविली, असे भारताचे नेते व लष्करी अधिकारी आत्मविश्‍वासाने सांगत आहेत. चीनच्या विरोधात भारताच्या राजकीय व लष्करी नेतृत्त्वाकडून केली जाणारी ही विधाने चीनला अधिकाधिक अस्वस्थ करणारी ठरतात. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची प्रतिष्ठा अधिकच वाढली असून त्याच प्रमाणात चीनचे महत्त्व कमी होत चालल्याचे दिसत आहे. यामुळे चीन एलएसीवर वर्चस्व गाजवून आपले लष्करी सामर्थ्य सार्‍या जगाला दाखवून देण्यासाठी धडपडत आहे. एलएसीवरील चीनच्या आक्रमकेतेचे हे खरे कारण असल्याचा दावा भारताच्या काही माजी लष्करी अधिकार्‍यांनी केला होता.

अशा काळात भारताने एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चीनबरोबर राजनैतिक व लष्करी स्तरावर चर्चा जरूर करावी. त्याचवेळी एलएसीवरील आपल्या लष्कराच्या क्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न भारताने करायलाच हवे. कारण चीनला ही लष्करी सामर्थ्याची भाषाच कळते, असे भारताचे माजी राजनैतिक अधिकारी सांगत आहेत.

leave a reply