बीजिंग – तैवानविरोधातील लष्करी साहस चीनसाठी ‘इकॉनॉमिक सुसाईड’ ठरेल, असा सज्जड इशारा जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी दिला होता. जपानच्या माजी पंतप्रधानांनी दिलेल्या या इशार्यामुळे कमालीचा अस्वस्थ झालेल्या चीनने जपानच्या राजदूतांना समन्स बजावले. माजी पंतप्रधान ऍबे यांचा इशारा चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारा आणि तैवानमधील स्वातंत्र्याची मागणी करणार्या गटांना समर्थन देणारा ठरतो, अशी टीका चीनने केली.
तैवानमधील अभ्यासगटाने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल बैठकीत बोलताना जपानचे माजी पंतप्रधान ऍबे यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पार्टी चुकीची पावले उचलत असल्याची आठवण करून दिली. चीनने तैवानविरोधात संघर्षाचे पाऊल उचलले तर चीनच्याच अर्थव्यवस्थेची जबरदस्त हानी होईल, असा इशारा ऍबे यांनी दिला होता.
त्याचबरोबर चीनच्या तैवान व जपानविरोधातील कारवायांमुळे चीन-जपानमधील शांतता आणि युद्धातील रेषा धूसर होत असल्याचे माजी पंतप्रधान ऍबे यांनी बजावले होते. यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ऍबे यांची ही विधाने चीनच्या सार्वभौमत्वाला उघडपणे आव्हान देणारी असल्याची टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.
पण बीजिंगमधील जपानचे राजदूत हिदिओ तारुमी यांनी चीनची टीका निराधार असल्याचे म्हटले आहे. जपानच्या सरकारमध्ये नसलेले आणि अशीच भूमिका असणारे जपानमध्ये बरेचजण आहेत. त्यांच्या विचारांसाठी जपानला जबाबदार धरता येणार नाही. तसेच यासंदर्भातील चीनची एकांगी भूमिका देखील जपानला मान्य नाही, असे राजदूत तारुमी यांनी म्हटले आहे.