नेप्यितौ, दि.१९ – थायलंडच्या सुरक्षा यंत्रणांनी गेल्या महिन्यात पकडलेला शस्त्रसाठा भारतविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येणारा होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी थायलंड व म्यानमारच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत सहाजणांना अटक केली असून त्यात पाकिस्तानी वंशाच्या दोघांचा समावेश आहे. म्यानमार तसेच थायलंडमध्ये चीनने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या मदतीने जाळे उभारले असून, त्याचा वापर या क्षेत्रातील भारताच्या हितसंबंधांविरोधात करण्याची योजना असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच म्यानमारच्या लष्करप्रमुखांनी देशातील दहशतवादी संघटनांना चीनचे सहाय्य मिळत असल्याचा आरोप केला होता.
गेल्या महिन्यात म्यानमार सीमेजवळील थायलंडच्या ‘माए सोत’ शहरात चिनी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला. त्यात ग्रेनेड लॉन्चर्स, रॉकेट्स, ऑटोमॅटिक ॲसॉल्ट रायफल्स आणि मशीन गन्सचा समावेश होता. याप्रकरणी थायलंडच्या यंत्रणांनी दोन थाई नागरिकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी म्यानमारच्या कॅरेन प्रांतातील निर्वासितांच्या छावणीवर छापा टाकून सहाजणांना ताब्यात घेतले. यात पाकिस्तानी वंशाच्या दोन नागरिकांचा समावेश आहे.
गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या चौकशीतून थायलंडच्या शहरात पकडलेला चिनी बनावटीचा शस्त्रसाठा म्यानमारच्या दहशतवादी संघटनासाठी असल्याचे स्पष्ट झाले. म्यानमारच्या राखिन प्रांतात कार्यरत असणाऱ्या ‘आराकान आर्मी’ व ‘आराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी’ या दोन्ही दहशतवादी संघटनांना ही शस्त्रे पाठविण्यात येणार होती. या संघटनांनी बांगलादेश तसेच भारताच्या सीमाभागात दहशतवादी कारवाया तसेच घातपात घडविण्यासाठी तळ उभारल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. बांगलादेश-म्यानमार सीमेवरील रोहिंग्या निर्वासित तसेच बांगलादेशमधील दहशतवादी संघटना म्यानमारच्या दहशतवादी गटांना सहाय्य करीत असल्याचेही सांगण्यात येते. हे सर्व जाळे उभारण्यासाठी चीनने पाकिस्तानची मदत घेतली असून पाकिस्तानची ‘आयएसआय’ यात सक्रिय सहभागी आहे.
भारताने म्यानमारसह पुढे आग्नेय आशियाशी सहकार्य वाढविण्यासाठी ‘कलादन मल्टी मोडल प्रोजेक्ट’ राबविला आहे. त्याअंतर्गत भारतीय सीमेवर तसेच म्यानमारमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे या भारताचा म्यानमारमधील प्रभाव वाढत असून ही बाब चीनला चांगलीच खटकली आहे. भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी चीनने म्यानमारमधील दहशतवादी गटांना हाताशी धरले असून त्यांच्यामार्फत भारतीय प्रकल्पांवर हल्ले चढवण्यात येत आहेत. त्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने बांगलादेश तसेच थायलंडमध्ये उभारलेल्या नेटवर्कचा वापर करण्यात येत आहे.
थायलंडमध्ये पकडण्यात आलेला शस्त्रसाठा व त्यानंतर झालेल्या कारवाईतून याला स्पष्ट दुजोरा मिळाला आहे. ईशान्य भारतात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी तसेच बंडखोर संघटनांना पाकिस्तान सहाय्य करत असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. मात्र आता इतर देशांमधील भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचवण्यासाठी चीन व पाकिस्तान यांनी हातमिळवणी केल्याचे थायलंडच्या कारवाईतून दिसून आले आहे. ही बाब भारतीय यंत्रणांची चिंता अधिकच वाढविणारी ठरते.