चीनने अफगाणिस्तानची जाहीर माफी मागावी

- अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह

काबुल – अफगाणिस्तानात गुप्तचर पेरून त्यांच्यामार्फत दहशतवादी केंद्र चालवून चीनने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या विश्‍वासाला धक्के देणार्‍या चीनने जाहीर माफी मागावी, अशी मागणी अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी केली. चीनने माफी मागितली तरच अफगाणी सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यातील चिनी हेरांची सुटका करण्यात येईल, असेही सालेह यांनी बजावले. अफगाणिस्तानच्या या मागणीमुळे चीनवर नामुष्की ओढावल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने राजधानी काबुलमध्ये केलेल्या कारवाईत १० चिनी नागरिकांचा समावेश असलेले दहशतवादी सेल उद्ध्वस्त केले होते. अफगाणिस्तानच्या ‘नॅशनल डायक्टोरेट ऑफ सिक्युरिटी’ने (एनडीएस) या दहा जणांना अटक केल्यानंतर अधिक माहिती उघड झाली होती. या दहशतवाद्यांमध्ये चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणार्‍या ‘ली यांगग्याँग’चाही समावेश होता. जुलै ते ऑगस्ट महिन्यापासून यांगग्याँग अफगाणिस्तानात सक्रीय होता.

त्याचबरोबर काबुलच्या शिरपूर भागात रेस्टॉरंट चालविणर्‍या ‘शा हूंग’ या चिनी महिलेचाही दहा जणांमध्ये समावेश आहे. यांगग्याँग आणि शा, हे दोघेही पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते. यांगग्याँग आणि शा यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा त्याचबरोबर अमली पदार्थ देखील सापडले आहेत. या दहशतवादी नेटवर्कच्या आड यांगग्याँग आणि शा हेरगिरीचे नेटवर्कही चालवित असल्याची माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष आणि गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख अमरुल्लाह सालेह यांनी या प्रकरणी कठोर भूमिका स्वीकारली आहे. अफगाणींचा विश्‍वासघात करणार्‍या चीनने याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी सालेह यांनी केली आहे. तर चीनने या प्रकरणी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

leave a reply