अमेरिकेत यापूर्वीही चीनचे ‘स्पाय बलून्स’ आढळले होते

- अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा दावा

वॉशिंग्टन – शनिवारी अमेरिकेने पाडलेला चीनचा ‘स्पाय बलून’ ही एकमेव घटना नसून यापूर्वीही चीनने अमेरिकेच्या हद्दीत ‘स्पाय बलून्स’ धाडले होते. चीनचे हे बलून्स ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या नियोजनबद्ध कटकारस्थानाचा भाग असू शकतात, असा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने केला. अमेरिकी प्रशासन व संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात येत असल्याचे ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. चार महिन्यांपूर्वी एक चिनी ‘स्पाय बलून’ हवाई बेटांनजिक कोसळला होता, तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत तीन वेळा चीनचे ‘स्पाय बलून्स’ अमेरिकेच्या हद्दीत घुसले होते, असे अमेरिकी वृत्तवाहिनीने स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अलास्का प्रांतानजिकच्या हद्दीतून चीनच्या स्पाय बलूनने अमेरिकेत घुसखोरी केली होती. त्यानंतर कॅनडाच्या हद्दीत काही काळ टेहळणी करून अमेरिकेच्या इदाहो प्रांतात व मोंटानामध्ये घुसखोरी केल्याचे आढळले होते. मोंटानातील फोटोग्राफ्स माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात समोर आल्याने अमेरिकेच्या संरक्षण विभागाला त्यावर खुलासा देणे भाग पडले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने बायडेन प्रशासनाला तातडीने बलून नष्ट करणे भाग पडले होते.

शनिवारी अमेरिकेच्या ‘एफ-22’ रॅप्टर लढाऊ विमानाने सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर करून चीनचा ‘स्पाय बलून’ उडवून दिला होता. त्याचे अवशेष गोळा करण्याची मोहीम अजूनही सुरू आहे. याप्रकरणी बायडेन प्रशासनाने चीनविरोधात मोठी कारवाई केल्याचा देखावा करून आपली पाठ थोपटून घेतली होती. मात्र प्रत्याक्षात चार महिन्यांपूर्वी व त्यापूर्वीही ट्रम्प प्रशासनाच्या काळात चीनच्या ‘स्पाय बलून्स’नी अमेरिकेच्या हद्दीत टेहळणी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अमेरिकेच्या ‘फॉक्स न्यूज’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त देताना यावेळी आढळलेला चीनचा ‘स्पाय बलून’ हा सर्वाधिक काळ अमेरिकेच्या हद्दीत आढळलेला बलून असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

अवघ्या चार महिन्यांपूर्वी पॅसिफिक महासागरात हवाई बेटांच्या क्षेत्रात चीनचा ‘स्पाय बलून’ टेहळणी करतानाची घटना उघड झाली होती. हा बलून लगेच कोसळल्याने त्यावर जास्त चर्चा झाली नव्हती. ट्रम्प यांच्या काळात फ्लोरिडा व टेक्सास प्रांतांच्या हद्दीत चीनचे ‘स्पाय बलून’ आढळले होते. गेल्या सात वर्षात चिनी स्पाय बलून्सच्या किमान पाच घटना घडल्याचे ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने सांगितले. याआधी चीनने पाठविलेले ‘स्पाय बलून्स’ संरक्षण विभाग अथवा गुप्तचर यंत्रणांना ‘ट्रॅक’ करता आले नव्हते, असा खळबळजनक दावाही एका अधिकाऱ्याने केल्याचे ‘फॉक्स न्यूज’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

चीनकडून पाठविण्यात येणारे ‘स्पाय बलून्स’ हा चीनच्या लष्कराने आखलेल्या नियोजनबद्ध कटकारस्थानाचा भाग असल्याचा दावाही अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे. या ‘स्पाय बलून्स’च्या माध्यमातून चीनने इतर देशांच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन केले आहे, याकडेही अमेरिकी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. अमेरिकेने ‘स्पाय बलून’वर केलेल्या कारवाईमुळे अमेरिका व चीनमधील संबंध अधिकच चिघळल्याचा दावा अमेरिकी विश्लेषकांनी केला आहे.

दरम्यान, अमेरिकेने नागरी मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या हवाई यंत्रणेविरोधात लष्करी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप चीनने केला आहे. याप्रकरणी अमेरिकेच्या दूतावासाकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र विभागाने दिली. दोन देशांमधील संबंध सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचा ठपकाही चीनने यावेळी ठेवला.

leave a reply