‘साऊथ चायना सी’मध्ये विमानवाहू युद्धनौका पाठविणार्‍या ब्रिटनला चीनची धमकी

बीजिंग – ब्रिटनने ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात आपली विमानवाहू युद्धनौका रवाना करण्याची घोषणा केली होती. पण या घोषणेमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने ब्रिटनला धमकावले आहे. ‘‘साऊथ चायना सी’च्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी चीन आवश्यक ती पावले उचलेल’, असा इशारा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिला. दरम्यान, गेल्या महिन्यात ब्रिटनने इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे वाढते महत्त्व अधोरेखित करून भारताबरोबर या क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्याची घोषणा केली होती. त्यावरही चीनने आक्षेप घेतला होता.

‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ ही ब्रिटनच्या नौदलातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका मानली जाते. २०१७ साली सदर युद्धनौका ब्रिटनच्या नौदलात कार्यान्वित झाली होती. पण अद्याप ही युद्धनौका आपल्या पहिल्या सागरी मोहिमेसाठी निघालेली नाही. ब्रिटनचे माजी संरक्षणमंत्री गॅविन विल्यमसन यांनी दोन वर्षांपूर्वी ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’च्या पहिल्या सागरी मोहिमेची घोषणा केली होती. यामध्ये ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्राचाही समावेश होता. तर ब्रिटिश युद्धनौकेच्या या प्रवासात ‘ईस्ट चायना सी’च्या क्षेत्रात अमेरिका आणि जपानच्या युद्धनौका देखील सहभागी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

ब्रिटनने ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ या युद्धनौकेच्या ‘साऊथ चायना सी’ मोहिमेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. पण या वर्षाच्या अखेरीस ब्रिटिश युद्धनौका ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे बेचैनी वाढलेल्या चीनने ब्रिटिश विमानवाहू युद्धनौकेच्या मोहिमेवर टीका केली. ‘‘साऊथ चायना सी’ क्षेत्र हे आपल्या युद्धनौका आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करण्याचे ठिकाण नाही. या क्षेत्राशी कुठलाही संबंध नसणारे त्रयस्थ देशच हजारो किलोमीटर अंतरावरुन आपली युद्धनौका रवाना करून या क्षेत्राचे लष्करीकरण करीत आहेत’, असा आरोप चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते टान केफेई यांनी केला.

तर, ‘‘साऊथ चायना सी’चे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास त्याचबरोबर शांती आणि स्थैर्याच्या सुरक्षेसाठी चीनचे लष्कर आवश्यक ती पावले उचलेल’, असा इशारा केफेई यांनी दिला. तर या क्षेत्रातील चीनच्या लष्कराची तैनाती ही नेहमीच जागतिक शांततेसाठी सहाय्यक ठरल्याचा दावा चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला.

खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या ‘साऊथ चायना सी’च्या ९० टक्के सागरी क्षेत्रावर आपलाच अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई या देशांचे दावे देखील चीनने फेटाळले आहेत. पण चीनच्या या दावेदारीला अमेरिकेने वारंवार आव्हान देऊन आपल्या युद्धनौका या सागरी क्षेत्रात रवाना केल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेने भारताबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित केले. यामुळे चीन आधीच बेचैन झाला आहे.

अशा परिस्थितीत, ब्रिटनने देखील भारत-अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील सहकार्यात सहभागी होण्याबाबत केलेली घोषणा चीनच्या बेचैनीत वाढ करणारी ठरली. म्हणूनच चीनने ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकेच्या ‘साऊथ चायना सी’मधील मोहिमेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

leave a reply