नवी दिल्ली – ‘राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय झाल्यानंतरच्या काळात चीनच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवरील आक्रमकतेत अधिकच वाढ झाली. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन व अमेरिका यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू झालेली आहे’, असा इशारा ऑस्ट्रेलियाच्या लोवी इन्स्टीट्युटचे संचालक मायकल फुलीलव्ह यांनी दिला. आशिया खंडाची आर्थिक प्रगती आश्वासक आहे, पण आशियाच्या सुरक्षेबाबत तसा दावा करता येणार नाही, असे सांगून फुलीलव्ह यांनी चीनच्या आक्रमकतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका ठेवला.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणार्या वार्षिक व्याख्यानमालेत बोलताना फुलीलव्ह यांनी चीनच्या चिंताजनक कारवायांचे गांभीर्य लक्षात आणून दिले. शी जिनपिंग चीनच्या राष्ट्राध्क्षपदावर आल्यानंतर, चीनचे पूर्व आणि पश्चिम सीमेवरील वर्तन बदलले व त्याच फार मोठे आक्रमक बदल झाले, अशी नोंद फुलीलव्ह यांनी केली. चीनचे परराष्ट्र धोरण अधिकच कठोर बनले आणि चीनकडून इतरांवर लादण्यात येणार्या निर्बंधांमध्ये वाढ झाली. याबरोबरच आपल्यावर झालेली टीका सहन करण्याची चीनची क्षमताही याच काळात कमी झाली. याचे परिणाम दिसू लागले असून चीन ऑस्ट्रेलियाच्या विरोधात अतिशय जहाल भूमिका स्वीकारत असल्याचे दिसत आहे, असे फुलीलव्ह म्हणाले.
चीनच्या वर्तनात झालेला हा मोठा बदल हेच चीन आणि ऑस्ट्रेलियामधील तणाव विकोपाला जाण्याचे प्रमुख कारण ठरले, असे सांगून फुलीलव्ह यांनी चीनमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अस्थैर्य व अशांतता माजत असल्याचा ठपका ठेवला. चीनने फार मोठी आर्थिक प्रगती केली असली तरी भारताच्या आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सांगून आशियासाठी भारत तितकाच महत्त्वाचा ठरतो, असा दावा फुलीलव्ह यांनी केला आहे. आशियाचा उदय ही जगासाठी आश्वासक बाब ठरते. मात्र आशियाच्या सुरक्षेला असलेला धोका देखील तितकाच गंभीर आहे, असे सांगून चीनमुळे ही समस्या उद्भवल्याचे फुलीलव्ह यांनी लक्षात आणून दिले.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत स्वीकारलेले धोरण या क्षेत्राच्या अस्थैर्यात भर घालणारे ठरले. पण चीनच्या या क्षेत्रातील कारवाया इथला तणाव अधिकच वाढविणार्या ठरल्या. पुढच्या काळात इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन व अमेरिकेमधील स्पर्धा तीव्र होईल, असा इशारा फुलीलव्ह यांनी दिला आहे.