तैपेई/बीजिंग – तैवानच्या हद्दीत सातत्याने सुरू असलेल्या घुसखोरीबरोबरच चीन दबावतंत्राचा वापर करून तैवानी जनतेला धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी केला. अपप्रचाराद्ववारे चीन तैवानी जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचेही राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी बजावले. तैवानमधील प्रसारमाध्यमे व सोशल मीडियात शिरकाव करण्यात चीनने यश मिळविले असल्याचा इशारा विश्लेषकांनी यापूर्वीच दिला होता.
‘तैवानच्या हद्दीतील तणाव अजूनही निवळलेला नाही व धोकाही टळलेला नाही. चीनची लढाऊ विमाने व युद्धनौकांकडून तैवानच्या हद्दीतील घुसखोरी कायम आहे. त्याचबरोबर अपप्रचाराचा वापर करून तैवानी जनतेला अस्वस्थ करण्यासाठी दबावतंत्राचे प्रयोग तैवानी जनतेवर करण्यात येत आहे’, असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले. यावेळी राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी चीनकडून ड्रोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला असून त्यामागे तैवानच्या लष्कराला दडपणाखाली आणण्याची योजना असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षभरात तैवानने चीनसाठी काम करणाऱ्या अनेक हेर तसेच कंपन्यांवर कारवाई केली होती. या कारवाईतून चीनने तैवानमधील प्रचारयुद्धसाठी उभारलेल्या नेटवर्कचा पर्दाफाशही झाला होता. तैवानसारख्या लोकशाहीवादी देशात प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाला असलेल्या स्वातंत्र्याचा फायदा उचलून चीन तैवानी जनतेची भूमिका बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही यातून उघड झाले होते. यामागे चीनच्या लष्कराचा सहभाग असल्याचे दावे तैवानी अभ्यासगट व विश्लेषकांनी केले होते.
काही वर्षांपूर्वी तैवानमधील निवडणुकीत त्साई इंग-वेन यांच्याविरोधात तैवानी जनमत तयार करण्याचा चीनचा कट उघडकीस आला होता. मात्र चीनचा हा कट फसून त्साई इंग-वेन बहुमताने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या निवडीनंतर चीनने आपली मोहीम अधिकच तीव्र केली असून राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांच्या आरोपातून ही बाब अधिक प्रकर्षाने समोर आली आहे.