तैवानच्या सेमीकंडक्टर क्षेत्रावरील वर्चस्वासाठी चीनने आर्थिक युद्ध छेडले

- तैवानच्या मंत्र्यांचा आरोप

सेमीकंडक्टरतैपेई/बीजिंग/वॉशिंग्टन – तैवानच्या सेमीकंडक्टर्स क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी चीन आर्थिक युद्धाचा वापर करीत आहे, असा आरोप तैवानचे मंत्री लो पिंग चेंग यांनी केला. यात सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाची चोरी तसेच कुशल तंत्रज्ञांवर दबाव टाकून पळविणे व आर्थिक बळाचा वापर यांचा समावेश असल्याचा दावा चेंग यांनी केला. याप्रकरणी तैवान सरकारकडून काही चिनी कंपन्यांसह ६० हून अधिक चिनी नागरिकांची चौकशीही सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्याच महिन्यात युरोपातील एका आघाडीच्या कंपनीने, चीनच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आपली ‘ट्रेड सिक्रेट्स’ व ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी’ चोरण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला होता.

सेमीकंडक्टरगेल्या दशकभरात ‘५जी’पासून ते ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’पर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये चिनी कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी चीनने ‘सेमीकंडक्टर’ क्षेत्राकडे लक्ष वळविले असून २०१८ सालापासून या क्षेत्रातील हालचाली अधिक आक्रमक केल्या आहेत. चीनच्या सत्ताधारी राजवटीने सेमीकंडक्टर क्षेत्राच्या संशोधन व विकासासाठीची गुंतवणूक दुपटीने वाढविली आहे. यामागे अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्ध व तंत्रज्ञन क्षेत्रातील महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा हे दोन घटक कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

सध्याच्या घडीला सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनच्या कंपन्या अमेरिका, युरोप व तैवान यासारख्या देशांवर अवलंबून आहेत. सेमीकंडक्टर क्षेत्रातील सध्याची आघाडीची कंपनी ‘टीएसएमसी’ तैवानची आहे. तर १० आघाडीच्या कंपन्यांमध्ये सहा अमेरिकन, दोन कोरियन व एका युरोपियन कंपनीचा समावेश आहे. चीन व पाश्‍चात्य देशांमध्ये असलेला तणाव पाहता सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांकडून चीनला सेमीकंडक्टरसहाय्य मिळण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे आघाडीवर नसलेल्या पण सक्रिय असणार्‍या इतर कंपन्यांकडून सहाय्य घेऊन चीन पुढे जाण्याचा आटापिटा करीत आहे.

त्याचवेळी दुसर्‍या बाजूला सेमीकडंक्टर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या तैवानला लक्ष्य करण्यात येत आहे. तैवानी कंपन्या चीनला सेमीकंडक्टर्सचा पुरवठा करीत असून काही कंपन्यांचे चीनमध्ये कारखानेही आहेत. मात्र चीनने तैवानकडे असलेले प्रगत तंत्रज्ञान तसेच कुशल तंत्रज्ञांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काही चिनी कंपन्या तैवानचे नियम धुडकावून तैवानमध्ये सक्रिय झाल्याचा आरोपही तैवानचे सेमीकंडक्टरकार्यकारी मंत्री पिंग चेंग यांनी केला. चीनच्या या सर्व कारवाया तैवानविरोधातील आर्थिक युद्धाचा भाग असल्याचेही चेंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेने सेमीकंडक्टर क्षेत्रात तैवान, जपान व दक्षिण कोरियाला बरोबर घेऊन नवी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दक्षिण कोरियातील एका दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ही आघाडी अमेरिकेकडून चीनच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील कारवाया रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे सांगण्यात येते. तैवान व जपान यासाठी तयार असले तरी दक्षिण कोरिया याबाबत नकारात्मक भूमिकेत असल्याचे समोर येत आहे. दक्षिण कोरियाच्या कंपन्यांची चीनमधील गुंतवणूक हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे कोरियन दैनिकाने म्हटले आहे.

leave a reply