वॉशिंग्टन – चीन तैवानवर ताबा मिळविण्यासाठी लष्करी बळाऐवजी सायबरहल्ल्यांचा वापर करु शकतो, असा इशारा अमेरिकेच्या माजी नौदल अधिकाऱ्यांनी दिला. चीन सायबरहल्ल्यांच्या सहाय्याने तैवानचे ‘सॅटेलाईट कम्युनिकेशन नेटवर्क’ व इतर संवेदनशील यंत्रणा ठप्प करेल, असे निवृत्त रिअर ॲडमिरल मार्क माँटगोमेरी यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच तैवानच्या संसद सदस्यांनी देशावर दररोज दोन कोटी सायबरहल्ले होत असून त्यातील बहुतांश हल्ल्यांचे मूळ चीनमध्ये असल्याकडे लक्ष वेधले होते.
काही दिवसांपूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनात, तैवानसाठी लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही, अशा शब्दात आक्रमक इशारा दिला होता. त्यानंतर चीनचे तैवानवरील आक्रमण व पाश्चिमात्य देशांकडून तैवानला करण्यात येणाऱ्या सहाय्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी अधिकाऱ्यांनी सायबरहल्ल्याबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
‘चीनने चढविलेल्या सायबरहल्ल्यांमुळे अमेरिकेकडून तैवानच्या सुरक्षेसाठी पुरविण्यात येणाऱ्या संरक्षणयंत्रणा निकामी होऊ शकतात. चीन तैवानला सहाय्य करणाऱ्या इतर देशांच्या यंत्रणा तसेच तैनातीवरही सायबरहल्ले चढवू शकतो. चीनकडून तैवानमधील उपग्रह संपर्कयंत्रणा लक्ष्य केली जाऊ शकते’, असा इशारा अमेरिकी नौदलातील माजी अधिकारी माँटगोमेरी यांनी दिला.
‘डिजिटल सोसायटी प्रोजेक्ट’ने सादर केलेल्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर सर्वाधिक अपप्रचाराचे लक्ष्य ठरलेल्या देशांमध्ये तैवानचा समावेश आहे. गेली नऊ वर्षे तैवानवर सातत्याने मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले होत असून त्यातून खोटी माहिती पसरविण्याचा तसेच तैवानी जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तैवानचे संसद सदस्य वँग तिंग-यु यांनी, देशावर दररोज दोन कोटी सायबरहल्ले होत असून त्यातील बहुतांश चीनकडून होत असल्याकडे लक्ष वेधले. चीनने सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून तैवानमधील निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा कट आखल्याची घटनाही उघड झाली होती.