वॉशिंग्टन – गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमध्ये लागू केलेली झिरो कोविड पॉलिसी आणि रिअल इस्टेटमधील संकटाचे दूरगामी परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होतील. तिसऱ्यांदा चीनची सूत्रे हाती घेणारे जिनपिंग यांच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात या देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसेल. याचे नकारात्मक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील, असा इशारा अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी दिला. आंतरराष्ट्रीय अभ्यासगट आणि उद्योगक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी देखील चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत अशाच स्वरूपाची चिंता व्यक्त करीत आहेत.
शी जिनपिंग यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशातील संकटात सापडलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला पुनर्जिवित करण्यासाठी आर्थिक तरतूदीची घोषणा केली. कम्युनिस्ट पार्टीच्या नियंत्रणाखाली असलेल्या चीन तसेच हाँगकाँगमधील माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर होईल आणि दरवर्षीप्रमाणे घोषित आर्थिक विकासदर गाठण्यात चीन यशस्वी होईल, असा दावा या चिनी माध्यमांनी केला होता. पण यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण थांबणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ आणि बड्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी लक्षात आणून देत आहेत.
दहा वर्षांपूर्वी जिनपिंग यांनी सत्ता हाती घेतली, त्यावेळी चीनसाठी पोषक आर्थिक वातावरण तयार झाले होते. चीनची अर्थव्यवस्था वार्षिक सात टक्के दराने विकास करीत होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये बरेच काही बदल झाले आहेत, याकडे अमेरिकेतील ‘अटलांटिक काऊन्सिल’ या अभ्यासगटातील जिओ इकॉनॉमिक्स सेंटरचे संचालक निल्स ग्रॅहम यांनी लक्ष वेधले. जिनपिंग यांच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात चीनचा विकासदर नियोजित लक्ष्य देखील गाठू शकणार नाही, १९८९ सालानंतर पहिल्यांदाच चीनबाबत असे घडेल, या देशाच्या अर्थव्यवस्थेत जबरदस्त घसरण होईल, असा इशारा ग्रॅहम यांनी दिला.
कठोर झिरो कोविड पॉलिसीमुळे आपल्या देशाचा विकासदर मंदावल्याचा दावा चीनने अधिकृतस्तरावर केला आहे. पण चीनच्या अर्थव्यवस्थेवरील या संकटासाठी इतरही कारणे जबाबदार असल्याचे ग्रॅहम यांनी सांगितले. एव्हरग्रँडसारख्या रिअल इस्टेट संकट, बेरोजगारीची वाढती संख्या देखील या देशाच्या तिजोरीवरील ताण वाढवित आहेत. कोरोनाच्या संकटानंतरच चीनच्या अर्थव्यवस्था मंदावली, असे अजिबात नाही. कोरोनाने उच्छाद माजविण्या आधीच, झिरो कोविड पॉलिसी लागू करण्याआधीच चीनचा विकासदर मंदावला होता, याची आठवण ग्रॅहम यांनी करून दिली.
त्याचबरोबर महासत्ता म्हणून चीन प्रगती करीत असला तरी डिजिटल कॉमर्ससारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात चीनचा विकास मंदावलेला आहे, असा दावा ग्रॅहम यांनी केला. इतर देशांच्या अर्थव्यवस्था डिजिटल कॉमर्समध्ये भराभर प्रगती करीत असताना जिनपिंग यांच्या राजवटीने गेल्या आठ वर्षात या क्षेत्रावर बरीच मर्यादा टाकल्या होत्या. त्यामुळे डिजिटल कॉमर्समधील चीनची रँकिंग देखील कोसळल्याचे ग्रॅहम म्हणाले. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये चीनने परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास गमावल्याची जाणीव अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी करून दिली.
तर कठोर झिरो कोविड पॉलिस लागू करून चीनने जागतिक अर्थव्यवस्थेतील आपले स्थान कमजोर करून घेतल्याचा दावा ‘एमिराट्स शिपिंग’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सीईओनी केला.