ईस्ट चायना सीमध्ये जपानी बेटानजिक चीनचे मालवाहू जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा बळी

- जपान व दक्षिण कोरियाकडून शोधमोहीम

चीनचे मालवाहू जहाजटोकिओ/बीजिंग – ईस्ट चायना सीमधील जपानच्या ‘दान्जो आयलंडस्‌‍’ भागात चीनचे मालवाहू जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत किमान आठ जणांचा बळी गेला. यातील सहा जण चिनी नागरिक असून दोन म्यानमारचे नागरिक असल्याची माहिती जपानी यंत्रणांनी दिली. मंगळवारी ही दुर्घटना घडल्याचे जपान व दक्षिण कोरियाने स्पष्ट केले. ईस्ट चायना सीला गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांचा फटका बसला असून त्यामुळेच जहाज बुडाले असावे, असा दावा दक्षिण कोरियाच्या यंत्रणांनी केला.

चीनचे मालवाहू जहाजहाँगकाँगमध्ये नोंदणी झालेले जिन तिआन हे मालवाहू जहाज गेल्या महिन्यात मलेशियावरून निघाले होते. दक्षिण कोरियातील इंचेऑन बंदरात दाखल होणारे हे जहाज मंगळवारी ईस्ट चायना सीमधील वादळी वातावरणात दुर्घटनाग्रस्त झाले. जपानच्या दान्जो आयलंडस्‌‍पासून सुमारे 100 किलोमीटर्सवर असताना या जहाजाने ‘डिस्ट्रेस सिग्नल पाठविला. त्यानंतर जपान व दक्षिण कोरियाच्या तटरक्षकदलाने व्यापक शोधमोहीम सुरू केली. याला प्रारंभिक यश मिळाले असून आठ जणांचा बळी गेल्याचे या मोहिमेत स्पष्ट झाले. तर सहा जखमींना वाचविण्यात यश आले असून त्यांना जपानमधील रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरितांचा शोध सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी दिली आहे. या जहाजावर एकूण 22 जण असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनचे मालवाहू जहाजदरम्यान, या दुर्घटनेची अद्याप सारी माहिती समोर आलेली नाही. वादळी वाऱ्यामुळे हे जहाज बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो. पण अद्याप अधिकृत पातळीवर याला दुजोरा मिळालेला नाही. हे जहाज बुडालेले क्षेत्र संवेदनशील असल्याने यासंदर्भात संपूर्ण माहिती हाती आल्याखेरीज कुठल्याही प्रकाराचे दावे न करण्याची दक्षता घेतली जात आहे. ईस्ट चायना सी क्षेत्रातील हा वादग्रस्त भाग असून यावर जपान आणि चीनचे सातत्याने खटके उडत आलेले आहेत. या भागात चीनच्या जहाजांची घुसखोरी सुरू असते व याद्वारे इथल्या जपानच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो. जपान देखील चीनला त्याच भाषेत उत्तर देऊन या क्षेत्रावरील चीनचे दावे फेटाळून लावत आहे. काही दिवसांपूर्वीच जपानने या भागातील आपल्या तैनातीत मोठ्या प्रमाणात वाढ केली होती.

leave a reply