चीनच्या लढाऊ विमानांची तैवानच्या हद्दीत महिन्यातील १४वी घुसखोरी

तैपेई – चीनच्या तीन लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत नवी घुसखोरी केली. गेल्या १७ दिवसांमध्ये चीनच्या विमानांची तैवानमधील ही १४ वी घुसखोरी ठरते. काही तासांपूर्वीच तैवानने अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक फ्रेमवर्क’मधील सामील होण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर चीनच्या विमानांनी ही घुसखोर करून तैवानला इशारा दिल्याचे दिसत आहे.

चीनच्या लढाऊ विमानांची तैवानच्या हद्दीत महिन्यातील १४वी घुसखोरीचीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स’च्या तीन विमानांनी सोमवारी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. चीनच्या इलेक्ट्रॉनिक हेरगिरी तसेच पाणबुडीविरोधी विमानांचा यात समावेश होता. चीनच्या या विमानांना पिटाळण्यासाठी तैवानने रेडिओद्वारे संदेश दिला, तसेच आपली लढाऊ विमाने रवाना केली. त्याचबरोबर चिनी विमानांना इशारा देण्यासाठी हवाई सुरक्षा यंत्रणाही कार्यान्वित केली.

गेल्या वर्षी चीनने तैवानच्या हवाईहद्दीत ९६१ विमाने घुसविली होती. तर या नववर्षाच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच चीनच्या ५० विमानांनी तैवानमध्ये घुसखोरी केली. चीनच्या घुसखोरीच्या या वाढत्या घटना म्हणजे तैवानवरील आक्रमणापूर्वीची तालीम असल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूला चीनच्या मच्छिमारी जहाजांचा व बोटींचा समावेश असणारा ‘नेव्हल मिलिशिआ’ तैवानच्या सागरी हद्दीचे सातत्याने उल्लंघन करीत आहेत.

चीनकडून तैवानच्या हवाई व सागरी हद्दीत सातत्याने सुरू असलेली घुसखोरी हा तैवानला धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर चीन तैवानची संरक्षणक्षमता खच्ची करण्यासाठी हे घडवित असल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. चीनच्या या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवान अमेरिकडून अधिक पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या कारवाया व ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’ला शह देण्यासाठी अमेरिकेने आखलेल्या योजनेत सहभागी होण्याची घोषणा तैवानने केली आहे.

leave a reply