नवी दिल्ली – सीमेवर शांतता आणि सलोखा प्रस्थापित झाल्याखेरीज, भारत-चीन संबंध सुधारणार नाहीत, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना पुन्हा एकदा करून दिली. भारताच्या दौर्यावर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. मात्र भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानात ओआयसीच्या बैठकीत काश्मीरबाबत भारताला चिथावणी देणारी विधाने करणार्या चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारताने योग्य ती ‘समज’ दिल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भेट घेऊन चर्चा केली. भारताबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी एलएसीवरील तणाव कमी करणे अत्यावश्यक ठरते. सध्या लडाखच्या एलएसीवर असलेला तणाव दोन्ही देशांच्या संबंधांसाठी उपकारक ठरणारी बाब नाही. म्हणूनच चीनने आधी लडाखच्या एलएसीवरील लष्कर मागे घ्यावे. त्यानंतर राजनैतिक प्रक्रिया सुरू होईल, असे डोवल यांनी परराष्ट्रमंत्री वँग ई यांना सुनावले. तसेच डोवल यांनी ही चर्चा एलएसीवरील तणावावर केंद्रीत ठेवल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्या द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेची माहिती देताना जयशंकर यांनीही एलएसीवरील तणाव कमी झाल्याखेरीज भारताचे चीनबरोबरील संबंध सुधारणार नाही, असे स्पष्ट केले. जर चीन भारताबरोबरील संबंध सुधारण्याबाबत गंभीर असेल, तर एलएसीवरील तणाव कमी करावाच लागेल, असे जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात वँग ई यांना बजावले. सध्या लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण हे काम अपेक्षित गतीने नाही, तर मंदगतीने सुरू आहे, असे सांगून जयशंकर यांनी भारताची यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केले. दोन्ही देशांनी परस्परांमध्ये झालेल्या करारांचा आदर करावा, ठरलेल्या संकेताचे पालन करावे, अशी भारताची अपेक्षा असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले.
दरम्यान, भारतात येण्याच्या आधी पाकिस्तानात पार पडलेल्या ओआयसीच्या बैठकीत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरच्या मुद्यावर भारताला चिथावणी देणारी विधाने केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भारत मानवाधिकारांचे उल्लंघन करीत असून याबाबत चीनलाही चिंता वाटत असल्याचा दावा वँग ई यांनी केला होता. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली होती. काश्मीरच्या प्रश्नाशी चीनचा संबंध नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले होते. तर काश्मीरबाबतची चीनची भूमिका स्वतंत्र असेल, चीन यासंदर्भात दुसर्या देशाच्या सांगण्यावरून भूमिका स्वीकारणार नाही, अशी भारताची अपेक्षा असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आपली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा झाली असून भारताची भूमिका यावेळी त्यांच्यासमोर ठेवल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.
काश्मीरबाबत वँग ई यांनी केलेल्या विधानांचा परिणाम त्यांच्या भारतभेटीवर झाल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या दौर्याला भारताने अधिक महत्त्व देण्याचे टाळले. या कोरड्या प्रतिसादाद्वारे भारताने चीनला समज दिल्याचे दिसत आहे. यामुळे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची पंचाईत झाली असून आपल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या भारत दौर्याची माहिती काही काळाने उघड केली जाईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.