इस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात चीनने उभारलेले मोबाईल नेटवर्क टॉवर स्फोटके लावून उडविण्यात आले. अज्ञात व्यक्तींनी हा स्फोट घडविल्याचा दावा स्थानिक यंत्रणा करीत आहेत. पण पाकिस्तानच्या लष्कराविरोधात संघर्ष करणारी आणि चीनच्या गुंतवणुकीला विरोध करणारी तेहरिक-ए-तालिबान ही दहशतवादी संघटना यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील नॉर्थ वझिरिस्तान प्रांतात गेल्या आठवड्यात मोठा स्फोट झाला. ‘चायना मोबाईल पाकिस्तान’ या चिनी कंपनीने उभारलेले मोबाईल नेटवर्क टॉवर या स्फोटात जमिनदोस्त झाले. इंटरनेट सेवा सुरू होऊन दोन दिवसच झाले होते, तोच हा हल्ला झाला. यामुळे सदर भागातील इंटरनेट सेवा पुन्हा एकदा कोलमडली.
कुठल्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण ‘तेहरिक-ए-तालिबान-टीटीपी’ तसेच इतर दहशतवादी संघटनांचे सदर भागात वर्चस्व आहे. त्यामुळे टीटीपीने हा हल्ला घडविल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो. आपल्या प्रकल्पांना लक्ष्य करणार्या टीटीपी तसेच बलोच लिबरेशन आर्मी-बीएलए या गटांवर पाकिस्तानी लष्कराने कारवाई करावी, यासाठी चीन पाकिस्तानवर दबाव टाकत आहे.
तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केल्यापासून पाकिस्तानच्या सीमाभागातील टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. वझिरिस्तान, स्वात, खुर्रम या भागात टीटीपीचे दहशतवादी पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढवित असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. येथील काही भागात टीटीपीने आपले नियम लादले असून पाकिस्तानचे कायदे इथे लागू होणार नसल्याचे घोषित केले आहे. तर काही ठिकाणी पाकिस्तानी लष्कराचे जवान मोटारी व शस्त्रास्त्रे सोडून पळून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.