चिनी जनतेने अन्नधान्याचा साठा करून ठेवावा

- कम्युनिस्ट राजवटीची सूचना

बीजिंग – येत्या काळातील कुठल्याही प्रकारची आणीबाणी येऊ शकते, हे लक्षात घेऊन जनतेने धान्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, अशी सूचना चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपल्या जनतेला केली. चीनच्या राजवटीने याचे कारण उघड केलेले नाही. पण यामुळे चीनच्या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता फैलाव किंवा कडक हिवाळा किंवा तैवानवरील हल्ल्याची तयारी, ही या सूचनेमागची कारणे असू शकतात, अशी शक्यता चिनी सोशल मीडियावर वर्तविली जात आहे.

चिनी जनतेने अन्नधान्याचा साठा करून ठेवावा - कम्युनिस्ट राजवटीची सूचनाचीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी स्थानिक यंत्रणांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यामध्ये अन्नधान्याच्या किंमती स्थीर ठेवून दैनंदिन वापराच्या गोष्टींचा पुरवठा खंडीत होता कामा नये. पुढील सहा महिन्यांसाठी ही खबरदारी ठेवावी, असे यात म्हटले आहे. त्याचबरोबर चिनी जनतेलाही अन्नधान्याचा साठा करुन ठेवण्याची सूचना केली आहे.

याआधी सप्टेंबर महिन्यातही कम्युनिस्ट राजवटीने असेच निर्देश जारी केले होते. पण यावेळी जनतेलाही सूचना केल्यामुळे चिनी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, चीनमधील महत्त्वाच्या प्रांतांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दीड वर्षापूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून ही सूचना केली असावी, असे दावे केले जातात.

तर चिनी सोशल मीडियावर काही जणांनी तैवानवर हल्ल्याची शक्यता वर्तविली. तैवानवर हल्ला झालाच तर देशात अन्नधान्याचा तुटवडा पडू नये, यासाठी ही सूचना असावी, अशी शक्यता काहीजणांनी वर्तविली. तर काही महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराने चीनमधील शेतीचे मोठे नुकसान केले असून हिवाळ्यात भाज्यांचे भाव कडाडू शकतात, याकडे काहीजण लक्ष वेधत आहेत.

दरम्यान, कम्युनिस्ट राजवटीला सदर सूचनेमागील कारण उघड करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. पण चिनी राजवटीचा पाठिंबा असलेल्या स्थानिक वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर चर्चा करणार्‍या चिनी जनतेला फटकारले. तसेच दिलेल्या सूचनेचे मुकाट्याने पालन करण्याचे सुनावले.

leave a reply