कोरोनाविरोधात फसलेल्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग राजीनामा देणार

- कॅनेडियन ब्लॉगरचा दावा

बीजिंग – कोरोनाची साथ रोखण्यासाठी राबविलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ फसल्याच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग राजीनामा देतील, असा दावा कॅनडातील ब्लॉगरने केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या ‘पॉलिटब्युरो’ बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याचे ‘लाओ डेंग’ या ब्लॉगरने म्हटले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ चिनी भाषेतील ‘यु ट्यूब’वर पोस्ट करण्यात आला आहे. जिनपिंग यांची जागा सध्याचे पंतप्रधान ली केकिआंग घेतील, असे या व्हिडिओत सांगण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना ‘ब्रेन ॲन्यूरिझम’ नावाचा मेंदूशी निगडित आजार असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

कोरोनाविरोधात फसलेल्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग राजीनामा देणार - कॅनेडियन ब्लॉगरचा दावा2018 साली जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी असलेली वयाची व कालावधीची मुदत रद्द केली होती. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या विचारसरणीमध्ये ‘शी जिनपिंग थॉट’ म्हणून आपल्या धोरणांचा व विचारांचा समावेश करणे भाग पाडले होते. जिनपिंग यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर नियंत्रण असणाऱ्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे प्रमुख पदही आपल्याकडे घेण्यात यश मिळविले होते. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने, जिनपिंग यांना ‘माओ’ व ‘डेंग’ या नेत्यांप्रमाणे महत्त्वाचे स्थान देणारा ठरावही मंजूर केला होता. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची देशावरील पकड अधिक घट्ट झाल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र गेल्या काही महिन्यात चीनमध्ये सातत्याने उद्भवणारे कोरोनाचे उद्रेक व त्याविरोधात कठोरपणे वापरण्यात येणारी ‘झीरो कोविड पॉलिसी’ या पार्श्वभूमीवर चीनमधील असंतोष वाढताना दिसत आहे. विशेषतः राजधानी बीजिंग व शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये हे धोरण अपयशी ठरल्याचे समोर आल्याने कम्युनिस्ट पार्टीच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला आहे. सोशल मीडियावरून सरकारविरोधात तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये जनता व सरकारी यंत्रणेत चकमकी व वाद झाल्याच्या घटनाही उघड झाल्या आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी ‘झीरो कोविड पॉलिसी’चे आक्रमक समर्थन करून त्याविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. ही बाब जनतेतील रोषात अधिकच भर टाकणारी ठरली आहे. जिनपिंग यांच्या कार्यपद्धतीवर व एकाधिकारशाहीवर कम्युनिस्ट पार्टीतील एक गट नाराज असल्याची वृत्ते यापूर्वीही प्रसिद्ध झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी अधिक तीव्र झाली असून सत्ताधारी पक्षातील एका गटाने जिनपिंग यांना आव्हान दिल्याचा दावा कॅनेडियन ब्लॉगरच्या व्हिडिओत करण्यात आला आहे.

‘पॉलिटब्युरो’च्या बैठकीतच ही घटना घडली असून जिनपिंग यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ‘लाओ डेंग’ या ब्लॉगरने म्हटले आहे. जिनपिंग यांच्यानंतर सध्या पंतप्रधानपदी असणारे ली केकिआंग सूत्रे हाती घेतील, असा दावाही ब्लॉगरने केला. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पक्षाच्या बैठकीपर्यंत जिनपिंग यांच्याकडे जबाबदारी राहिल व त्यानंतर केकिआंग सत्ता हाती घेतील, असे सांगण्यात येते. काही विश्लेषकांनी सदर वृत्त हे जिनपिंग यांच्याकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेचाच भाग असू शकतो, असाही दावा केला आहे.

leave a reply