कोलंबो – हेरगिरी करणारे चिनी नौदलाचे ‘युआन वँग ५’ हे जहाज मंगळवारी श्रीलंकेच्या हंबंटोटा बंदरावर दाखल झाले. भारताने नोंदविलेल्या आक्षेपानंतर देखील हे जहाज हंबंटोटा बंदराच्या धक्क्यावर लावण्यात चीनला यश मिळाले खरे. पण चीनला हंबंटोटा बंदरचाला लष्करी कारणांसाठी वापर करता येणार नाही, अशी ताकिद श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी दिलेली आहे. त्याचवेळी श्रीलंकेने चीनच्या या जहाजाला परवानगी देताना कडक अटी लादून हे जहाज आपल्या हंबंटोटा बंदरातील उपस्थितीचा गैरफायदा घेणार नाही, याची दक्षता घेतल्याचे दिसत आहे.
श्रीलंकेच्या हंबंटोटा बंदरावर दाखल झालेल्या आपल्या या जहाजापासून तिसऱ्या देशाच्या सुरक्षेला अजिबात धोका नाही. २०१४ सालीही आपल्या अशाच जहाजाने हंबंटोटा बंदराला भेट दिली होती, असा दावा श्रीलंकेतील चीनच्या राजदूतांनी केला. हे जहाज केवळ संशोधनासाठीच इथे आले आहे, असे चीनच्या राजदूतांनी स्पष्ट केले. २२ ऑगस्टपर्यंत हे जहाज हंबंटोटा बंदरावर असेल. या जहाजाच्या भेटीदरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी जपानच्या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिला. हंबंटोटा बंदराचा वापर चीन लष्करी कारणांसाठी करू शकत नाही, असे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी बजावले आहे.
दरम्यान, चीन आपले हे जहाज संशोधनासाठी हिंदी महासागर क्षेत्रात असल्याचे कितीही दावे करीत असले, तरी भारत आणि अमेरिका देखील त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. भारताने चीनच्या जहाजाची ही हंबंटोटा भेट अतिशय गंभीरपणे घेतल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील घडामोडींवर भारत नजर ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते. तर भारताचे बंदर विकास व नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी चिनी जहाजाच्या या भेटीआधी भारत कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले होते.
‘युआन वँग ५’ला आपल्या बंदरात प्रवेश देण्याच्या आधी श्रीलंकेने काही अटी घातल्याचे समोर आले होते. यानुसार सदर जहाज कुठे आहे, याची माहिती देणारी यंत्रणा सतत कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनेचा समावेश आहे.
तसेच श्रीलंकेच्या सागरी हद्दीत कुठल्याही स्वरुपाचे संशोधन करता येणार नाही, असेही श्रीलंकेने या जहाजाला प्रवेश देण्याच्या आधी बजावले होते. याद्वारे भारताचे सुरक्षाविषयक आक्षेप आपण विचारात घेतल्याचे श्रीलंका दाखवून देत आहे. याबरोबरच चीनचे हे जहाज हंबंटोटा बंदरात दाखल होण्याच्या आधी भारताने श्रीलंकेला ‘डॉर्निअर’ हे सागरी टेहळणी करणारे विमान पुरविले आहे. याचा औपचारिक समारंभ सोमवारी पार पडला. यावेळी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे उपस्थित होते.
भारत हा हिंदी महासागर क्षेत्रात ‘नेट सिक्युरिटी’ अर्थात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश आहे, हे श्रीलंकेला डॉर्निअर विमानाची भेट देऊन भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याचवेळी भारत व श्रीलंकेचे सुरक्षाविषयक सहकार्य दृढ असून ते समान हितसंबंधांवर आधारलेले आहे, हा इशारा देखील याद्वारे भारताने चीनला दिला आहे. श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांचे शासन असताना चीनने या देशाचा भारताच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न केला होता. श्रीलंकेला कर्जाच्या जाळ्यात अडकवून हंबंटोटा बंदर चीनने ९९ वर्षांसाठी बळकावले, त्यामागे चीनचे भारतविरोधी डावपेच होते. मात्र हंबंटोटा बंदर चीनच्या हवाली करताना देखील, श्रीलंकेने याचा लष्करी कारणांसाठी वापर करता येणार नाही, अशी अट चीनला घातली होती. त्यामागे भारताचा दबाव होता, असे दावे केले जातात.
आत्ता देखील श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी चीनला हंबंटोटा बंदराचा लष्करी हेतूसाठी वापर करता येणार नाही, याची जाणीव करून दिली आहे. यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या नैसर्गिक प्रभावाला आव्हान देण्याचा चीनचा आणखी एक डाव उधळण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.