अमेरिकेचे इशारे धुडकावून चीनच्या लढाऊ विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

तैवानच्या हद्दीततैपेई – तैवानच्या हद्दीत विमाने घुसवून युद्धाची धमकी देणार्‍या चीनने याची किंमत मोजायला तयार रहावे, असा इशारा अमेरिकेने काही दिवसांपूर्वी दिला होता. पण अमेरिकेच्या या इशार्‍याची पर्वा न करता, चीनच्या सात विमानांनी रविवारी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या या घुसखोरीची माहिती उघड केली. चीनबरोबरच अमेरिकेच्या गस्ती विमानाने देखील आपल्या हवाईहद्दीत प्रवेश केल्याचे तैवानने म्हटले आहे. दरम्यान, तैवानच्या हद्दीत विमाने घुसवून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेतील बायडेन प्रशासनाचा अंदाज घेत असल्याचा इशारा अमेरिकेतील विश्‍लेषक देत आहेत.

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाईदलातील पाच विमानांनी रविवारी सकाळी तैवानच्या निर्धारित हवाईक्षेत्रात घुसखोरी केली. यामध्ये ‘शांक्सी वाय-८’ टेहळणी विमान, दोन ‘जे-१०’ लढाऊ विमाने आणि दोन ‘जे-११’ बॉम्बर विमानांचा समावेश होता. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या या घुसखोरीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. याला काही तास उलटत नाही तोच रविवारी संध्याकाळी चीनच्या आणखी दोन जे-११ बॉम्बर विमानांनी तैवानच्या हवाईद्दीत पुन्हा घुसखोरी करून गस्त घातली. चीनबरोबर अमेरिकेच्या लष्करी विमानाने देखील आपल्या हवाईहद्दीतून प्रवास केल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याआधी अमेरिकेच्या लढाऊ तसेच लांब पल्ल्याच्या टेहळणी विमानांनी तैवानच्या हद्दीतून प्रवास केला होता. पण तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत चकार शब्द उच्चारला नव्हता.

दहा दिवसांपूर्वी चीनने तैवानच्या हवाईहद्दीत लढाऊ विमाने, बॉम्बर्स तसेच टेहळणी विमानांची घुसखोरी चीनने घडविली होती. तसेच तैवानच्या हवाई हद्दीजवळ चीनने युद्धसरावही आयोजित केला होता. या युद्धसरावाबरोबर चीनने तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्‍या व्यक्ती आणि गटांना धमकावले होते. तैवानच्या स्वातंत्र्याचे प्रयत्न म्हणजे युद्धाची धमकी असल्याचे चीनने धमकावले होते. यानंतर अमेरिकेेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी तैवानला धमकावणार्‍या चीनला त्याची किंमत मोजण्यास भाग पाडण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर तैवान तसेच हाँगकाँग, साऊथ चायना सीबाबत बायडेन प्रशासन अधिक आक्रमक भूमिका स्वीकारतील, असेही सुलिवन यांनी जाहीर केले होते.

पण बायडेन प्रशासनाच्या या धमक्यांची आपल्याला अजिबात पर्वा नसल्याचे चीनने गेल्या दहा दिवसात दाखवून दिले आहे. अमेरिकेचे वरिष्ठ विश्‍लषक गॉर्डन चँग यांनी चीनच्या या आक्रमकतेबाबत नुकताच इशारा प्रसिद्ध केला होता. चीनच्या लढाऊ विमानांची तैवानच्या हवाई हद्दीतील घुसखोरी योगायोग नाही. तर या घुसखोरीद्वारे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग बायडेन प्रशासन आपल्या विरोधात कोणती कारवाई करील याचा अंदाज घेत आहे, असे चँग यांनी म्हटले होते.

leave a reply