जेरूसलेम – जेरूसलेम येथील प्रार्थनास्थळाच्या आवारात इस्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी निदर्शकांमध्ये संघर्ष पेटला आहे. ज्यूधर्मियांचे टेंपल माऊंट व इस्लामधर्मियांची अल अक्सा मशिद असलेल्या या प्रार्थनास्थळातील काही भाग ज्यूधर्मिय पर्यटकांसाठी खुला केल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला होता. इस्रायलने प्रार्थनास्थळाच्या आवारात ज्यूधर्मियांना परवानगी दिली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने दिली होती.
गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी इस्रायलने ज्यूधर्मियांसाठी टेंपल माऊंट बंद केले होते. इस्लामधर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमझानच्या काळात त्यांच्या भावनांचा आदर ठेवून इस्रायलने हा निर्णय घेतला होता. गुरुवारी 5 मेपासून सकाळी सात वाजल्यानंतर टेंपल माऊंट ज्यूधर्मियांसाठी खुले करण्याची घोषणा इस्रायलने केली होती. त्यानुसार बुधवार रात्रीपासूनच या भागात ज्यूधर्मियांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायल सरकारच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. तसेच इस्रायलला या निर्णयाची जबर किंमत मोजावी लागेल, असे हमासने धमकावले होते. इस्रायल हा निर्णय घेऊन विस्तावशी खेळत असल्याचा इशारा हमासने दिला होता.
गेल्या वर्षी याच काळात सदर भागात इस्रायली सुरक्षा यंत्रणा आणि पॅलेस्टिनींमध्ये मोठा संघर्ष भडकला होता. याचे पडसाद वेस्ट बँक तसेच इस्रायलमधील अरब वस्त्यांमध्येही उमटले होते. हमासच्या प्रभावाखाली असलेल्या कट्टरपंथियांनी इस्रायली सुरक्षा यंत्रणांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यामुळे वेस्ट बँकमध्ये हमासचा प्रभाव वाढत असल्याचे उघड झाले होते. इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी याची नोंद घेतली होती.
या पार्श्वभूमीवर, हमासने यावेळी दिलेल्या इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्रायलने या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढविली आहे. पण बुधवार रात्रीपासूनच पॅलेस्टिनी निदर्शकांनी या परिसरात कुणालाही सोडायचे नाही, अशी आक्रमक मागणी केली. यामुळे इस्रायली सुरक्षा यंत्रणेचे जवान आणि या पॅलेस्टिनी निदर्शकांमध्ये संघर्ष भडकला. या निदर्शकांमध्ये हमासचे समर्थक व कट्टरपंथियांचा समावेश असल्याचे दावे केले जातात.