काबुल/इस्लामाबाद – ड्युरंड सीमेवर आपल्या लष्कराला सहन करावी लागणारी नामुष्की लपविण्याचा पाकिस्तानचा डाव तालिबानने हाणून पाडला आहे. सीमेवरील दंड पाटण भागात पाकिस्तानच्या लष्कराबरोबर संघर्ष भडकल्याची माहिती तालिबानचा प्रवक्ता बिलाल करिमी याने दिली. यामध्ये पाकिस्तानचे तीन जवान ठार झाल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने जाहीर केले. काही दिवसांपूर्वी तालिबानने ड्युरंड सीमेवर पाकिस्तानच्या मेजर पदावरील अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा, ‘फेडरली ॲडमिनिर्स्ड ट्रायबल एरियाज्-फाटा’ आणि बलोचिस्तान या प्रांतांना अफगाणिस्तानपासून विभागणारी ड्युंरड लाईन गेली कित्येक दशके वादाचा मुद्दा ठरत आहे. पाकिस्तानने बेकायदेशीररित्या अफगाणिस्तानच्या 10 प्रांतांचा घास गिळल्याचा आरोप अफगाणिस्तान सातत्याने करीत आहे. अफगाणिस्तानमधील आत्तापर्यंतच्या प्रत्येक सरकारने पाकिस्तानबरोबरची ड्युरंड सीमा मान्य नसल्याचे ठणकावले होते.
पण गेल्या वर्षी अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करणाऱ्या तालिबानने ड्युरंड सीमेवर तैनात पाकिस्तानच्या जवानांना पळ काढण्यास भाग पाडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पाकिस्तानचे लष्कर ड्युरंड सीमेवरील तणाव आपल्या माध्यमांपासून लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. स्थानिक माध्यमांना ड्युरंड सीमेबाबत बातमी न देण्याचे आदेश पाकिस्तानच्या लष्कराने दिले आहेत. तरी पण तालिबानकडून ड्युरंड सीमेवरील तणावाच्या बातम्या आणि पाकिस्तानी जवानांना धमकावण्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात. दोन दिवसांपूर्वी देखील अफगाणिस्तानच्या कुर्रम प्रांताच्या ड्युरंड सीमेजवळ तालिबान आणि पाकिस्तानच्या लष्करात संघर्ष पेटल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच तालिबानने पाकिस्तानच्या जवानांना ड्युरंड सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यापासून रोखल्याचे दावे केले जात होते. पाकिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात असलेल्या माध्यमांनी याबाबतची बातमी देण्याचे टाळले होते. पण तालिबानचा प्रवक्ता बिलाल करिमी याने अफगाणी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दंड पाटण येथील सीमेवर पेटलेल्या संघर्षात पाकिस्तानच्या तीन जवानांना ठार केल्याचे जाहीर केले.
ड्युरंड सीमेबाबत चर्चा सुरू असताना पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केल्यामुळे संघर्ष पेटल्याचा ठपका तालिबानी प्रवक्ता करिमी याने ठेवला. तालिबानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन जवान मारले गेल्याचे करिमीने सांगितले. यानंतर तालिबानच्या मोटारीने ड्युरंड सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीतून प्रवास केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. ही सर्व माहिती उघड झाल्यानंतर पाकिस्तानला देखील आपल्या तीन जवानांच्या मृत्यूची कबुली द्यावी लागली.
दरम्यान, ड्युरंड सीमेचा वाद पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. तालिबानने या सीमेवरील हल्ले वाढविले असून रॉकेट लाँचर्स तैनात केली आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानातील पश्तू नेत्यांकडूनही तालिबानच्या मागणीला समर्थन मिळत आहे. या वादामुळे पाकिस्तानचे तुकडे पडतील, अशी चिंता पाकिस्तानातील काही पत्रकार व्यक्त करीत आहेत.