देशात पहिल्यांदाच ‘क्यूकेडी’ तंत्रज्ञानाद्वारे दोन शहरांमध्ये संपर्क

- ‘डीआरडीओ’कडून यशस्वी चाचणी

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या प्रयागराज आणि विंध्याचल या दोन शहरांमध्ये ‘क्वांटम की डिस्ट्रीब्युशन’ (क्यूकेडी) या तंत्रज्ञानाचा वापर करून संपर्क प्रस्थापित करण्यात ‘डीआरडीओ’ला यश मिळाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये डीआरडीओने हैदराबाद येथे प्रथम या तंत्रज्ञानाचा चाचणी केली होती. त्यावेळी हैदरहबाद येथील ‘डीआरडीओ’च्या दोन प्रयोगशाळांमध्ये संपर्क प्रस्थापित करण्यात आला होता. तर यावेळी दोन निरनिराळ्या शहरांमध्ये असा ‘क्वांटम’ संपर्क स्थापन करण्यात आला. देशात पहिल्यांदाच ‘क्यूकेडी’ तंत्रज्ञानाचा वापर करून दोन शहरांमध्ये संपर्क स्थापन करण्याची क्षमता यशस्वीरित्या तपासण्यात आली. ही फार मोठी झेप ठरते. लष्करी व गोपनिय संपर्कासाठी हे तंत्रज्ञान भविष्यात अतिशय उपयोगी ठरणार आहे. यामुळे या चाचणीचे महत्त्व वाढते.

‘क्यूकेडी’संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) क्वांटम गतिशास्त्रावर आधारलेल्या ‘क्रिप्टोग्राफीक प्रोटोकॉल’चा वापर करून ‘क्यूकेडी’ अर्थात ‘क्वांटम की डिस्ट्रीब्युशन’ ही संपर्क पद्धती विकसित केली आहे. यामध्ये संपर्क करणार्‍या दोन पक्षांकडून ‘सिक्रेट की’ बनवून संपर्क केला जातो. या तंत्रज्ञानाद्वारे साधलेल्या संपर्क सुरक्षित समजला जातो. ही संदेशवहन यंत्रणा भेदने अशक्यकोटीतील गोष्ट असल्याचा दावा केला जातो.

त्यामुळे याद्वारे झालेले माहितीचे आदानप्रदान गोपनिय राहू शकते. याचा वापर लष्करी व गोपनिय कामासाठी होणार आहे. असे तंत्रज्ञान जगातील काही मोजक्या देशांकडे आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जपान आणि चीनने क्वांटम संपर्काचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. भारताला या देशांमध्ये स्थान मिळाले आहे.

डीआरडीओनेच नव्हे, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनेही (इस्रो) ‘क्वांटम क्रिप्टोग्राफीक’ संदेशवहन यंत्रणा विकसित केली आहे. याची चाचणी गेल्यावर्षी मार्च महिन्यात अमदाबाद येथे इस्रोने घेतली होती. ३०० मीटरवरील दोन ठिकाणांमध्ये याद्वारे संपर्क प्रस्थापित करण्यात आला होता.

डीआरडीओने उत्तर प्रदेशच्या प्रयागराज आणि विंध्याचल या दोन शहरांमध्ये ‘क्यूकेडी’ यंत्रणेच्या सहाय्याने संपर्काची चाचणी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या दोन शहरांमधील अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. या चाचणी आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार पार पडली व सर्व परिमाणांवर यशस्वी ठरली. डीआरडीओच्या संशोधकांबरोबर दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (आयआयटी) संशोधकांची टीमही या प्रयोगात सामील झाली होती. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतिश रेड्डी यांनी या यशानंतर संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

leave a reply