श्रीनगर – ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’चा (बीआरओ) जम्मू-काश्मीरच्या राजौरीपासून कोटरंका-बुढालपर्यंतचा ६० किलोमीटरचा महामार्ग बांधून पूर्ण झाला आहे. हा महामार्ग पीरपंजाल टेकड्यांमधून जातो.
पीरपंजालच्या टेकड्या काश्मीर खोऱ्याला राजौरी आणि पूंछशी जोडतात. तसेच राजौरी हा नियंत्रण रेषेला लागून असलेला जिल्हा असून येथील दुर्गम पीरपंजालच्या टेकड्यांमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटना सतत कट आखात असतात. यापार्श्वभूमीवर या नव्या मार्गाचे सामरिक महत्त्व वाढले आहे.
‘बीआरओ’च्या बॉर्डर रोड टास्क फोर्सच्या (बीआरटीएफ) ‘११० आरसीसी’ कंपनीने राजौरीपासून कोटरंकापर्यंतचा ६० किलोमीटरच्या महामार्गाचे काम पूर्ण केले. या महामार्गामुळे पीरपंजाल क्षेत्रातील धार, साकरी, पंजनदा, रेहन, स्वाडी, कंदी इत्यादी १०० गावे जोडली जाणार आहेत. महामार्ग बांधून पूर्ण झाल्यावर स्थानिकांनी आणि छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी या मार्गाने प्रवास देखील करायला सुरु केले आहे.
या महामार्गामुळे कित्येक अवघड गोष्टी सहज शक्य होतील. राजौरीमधील व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे सुकर जाईल. तसेच वैद्यकीय सुविधाही वेळेवर मिळतील, असे सांगून एका स्थानिकाने प्रशासनाचे आभार मानले. राजौरी दुर्गम भागात येत असल्यामुळे या जिल्ह्यातील कोणी आजारी पडल्यास उपचारांसाठी हॉस्पिटल गाठण्यासाठी सोयी-सुविधा नव्हत्या. या महामार्गामुळे ही चिंता दूर झाल्याचे सांगून गावकऱ्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. दैनंदिन जीवनात हा महामार्ग उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.
दरम्यान, पीरपंजाल क्षेत्रातल्या दहशतवाद्यांच्या हालचाली कमी झालेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी या भागात पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रात्रे उतरविली होती. त्यानंतर सुरक्षा दल सावध झाले आणि त्यानंतर या भागात सुरक्षाव्यवस्था अधिकच वाढविण्यात आली. तसेच जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीच्या नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्यांकडून नेहमी गोळीबारही सुरु असतो. अशा परिस्थितीत पिर पांजालच्या टेकड्यांमधून राजौरीपर्यंत जाणाऱ्या यामहामार्गाचे महत्व वाढते.