तेहरान/इस्लामाबाद – ‘इस्रायलसारख्या जुलमी राजवटीबरोबर सहकार्य प्रस्थापित करणे म्हणजे इस्रायलच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पॅलेस्टिनींकडे पाठ फिरविण्यासारखे आहे. हे सहकार्य इस्रायलला पॅलेस्टिनींवर नवे हल्ले चढविण्यासाठी बळ पुरवित आहे. नाईल ते युफ्रेटसपर्यंतचा भाग आपल्या ताब्यात घेणे, हे इस्रायलचे ध्येय आहे. त्यामुळे इस्रायलबरोबरची तडजोड इस्लामी देशांसाठी धोकादायक ठरेल’, असा इशारा इराणने दिला. पाकिस्तानमध्ये आयोजित ‘ओआयसी’च्या बैठकीत जगभरातील इस्लामी देशांनी इस्रायलविरोधात एकजूट करण्याचे आवाहन इराणने केले.
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’ची बैठक पार पडली. यामध्ये जगभरातील इस्लामी देशांचे परराष्ट्रमंत्री किंवा संबंधित अधिकारी उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री अमिरअब्दोल्लाहियान सिरिया दौर्यावर असल्यामुळे इराणने ओआयसीच्या या बैठकीसाठी आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांना रवाना केले होते. या बैठकीत इराणची भूमिका मांडताना खातिबझादेह यांनी सुरुवातीलाच पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केला. पश्चिम आशियातील वाढते असुरक्षा आणि अस्थैर्य हे पॅलेस्टाईनच्या मुद्याशी जोडलेले असल्याचा दावा खातिबझादेह यांनी केला.
इस्रायल पद्धतशीरपणे पॅलेस्टाईनच्या भूभागाचा ताबा घेत असल्याचा आरोप इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला. ‘स्वतंत्र आणि संपूर्ण पॅलेस्टाईन ही इस्लामी देशांची प्राथमिकता आहे. पण ओआयसीच्या स्थापनेला ५० वर्षे उलटल्यानंतरही पॅलेस्टिनी जनता अजूनही आपल्या अधिकारांपासून वंचित आहे’, अशी टीका खातिबझादेह यांनी केली. त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करणार्या अरब देशांवर नाव न घेता हल्ला चढविला. अरब देशांचे इस्रायलबरोबरचे सहकार्य हे जगभरातील इस्लामी देशांच्या इस्रायलविरोधातील एकजुटीला धक्का देणारे असल्याचा आरोप खातिबझादेह यांनी केला.
अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करुन इस्रायल इस्लामी देशांमध्ये घुसखोरी करीत असल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला. पॅलेस्टिनींच्या भूभागाचा पूर्ण ताबा घेतल्यानंतर इस्रायलला इजिप्तच्या नाईल नदीपासून ते इराकपर्यंत प्रवाहित होणार्या युफ्रेटस नदीपर्यंतचा भूभाग ताब्यात घ्यायचा असल्याचा ठपका खातिबझादेह यांनी ठेवला. इस्रायलविरोधात लष्करी कारवाई नाही तरी निदान इस्लामी देशांचे यावरील एकमत सर्वात महत्त्वाचे असल्याचे आवाहन इराणने केले.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी थेट उल्लेख केला नसला तरी गेल्या दीड वर्षात इस्रायलबरोबर अब्राहम करारांतर्गत सहकार्य प्रस्थापित करणार्या युएई, बाहरिन, मोरोक्को या देशांना त्यांनी लक्ष्य केले. खातिबझादेह यांनी ओआयसीच्या बैठकीत इस्रायलविरोधात स्वीकारलेल्या भूमिकेला अवघे काही तास उलटत नाही तोच, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख हुसेन सलामी यांनी इस्रायल तसेच अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ले चढविण्याची धमकी दिली. अमेरिकेने रिव्होल्युशनरी गार्ड्सवर लावलेल्या निर्बंधांमुळे इराणची ही संघटना अधिकच प्रबळ बनल्याची घोषणा सलामी यांनी केली.
दरम्यान, २०२० साली युएई व बाहरिन या देशांनी इस्रायलबरोबर अब्राहम करार केल्यानंतरही इराणने या दोन्ही देशांवर टीका केली होती. इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करून अरब देशांनी पॅलेस्टिनींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप इराणने केला होता. तर इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित झाले असले तरी आपण पॅलेस्टाईचा मुद्या सोडून दिलेला नाही, असे युएईने जाहीर केले होते.