नवी दिल्ली – ‘एम्स’ चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये कोरोनाचे सामुदायिक संक्रमण (कम्युनिटी ट्रान्स्फर) सुरु झाल्याची शक्यता व्यक्त करून त्यावर चिंता व्यक्त केली आहे. तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी ३१ जुलैपर्यंत केवळ दिल्लीतच साडे पाच लाख कोरोनाच्या रुग्णांची नोंद झालेली असेल, असा भीतीदायक दावा केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या दाव्याला दुजोरा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्र्यांशीही चर्चा केली.
मंगळवारपासून बुधवार सकाळपर्यंतच्या पर्यंत चोवीस तासात देशात २७९ जण कोरोनाने दगावले आणि सुमारे १० हजार नवे रुग्ण आढळले,. यामुळॆ देशातील एकूण रुग्णांची संख्या २ लाख ७७ हजारांजवळ पोहोचली. तर बुधवारी रात्रीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात १४९ जण दगावले, तर तब्बल ३,२५४ रुग्ण आढळले. हा राज्यात एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येचा उच्चांक आहे. याआधी मंगळवारी महाराष्ट्रात १२० जणांचा बळी गेला होता आणि २,२५९ नवे रुग्ण आढळले होते.
मुंबईत एका दिवसात तब्बल ९७ रुग्णांचा बळी गेला,तर १५०० नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोनाच्या रुग्ण संख्येच्या बाबतीत मुंबईने चीनच्या वुहान शहरालाही मागे टाकले आहे. महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या ९४ हजारांच्या पुढे कोरोनाच्या पोहोचली आहे. दिल्लीत १५०० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे दिल्लीत या साथीची रुग्ण संख्या ३२ हजारांवर पोहोचली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे (‘एम्स’) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशातील काही शहरांमध्ये सामुदायिक संक्रमणाची शक्यता वर्तविली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. गुलेरिया यांनी देशात ८० टक्के रुग्ण हे केवळ १० ते १२ शहरांमध्ये आहेत, याची आठवण करून दिली. या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव पहिल्यांदा रोखावा लागेल, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.
देशात उर्वरित भागात या साथीच्या रुग्णांची संख्या मोठी नाही. काही ठिकाणी ती कमीही होताना दिसत आहे. त्यामुळे देशात सामुदायिक संक्रमण झालेले नाही. मात्र दिल्ली, मुंबईत या साथीचे रुग्ण ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहता सामुदायिक संक्रमणाची दाट शक्यता आहे.दिल्लीत रुग्ण दुप्पट होण्याचा दर १२ ते १३ दिवसांवर आला आहे, याकडे डॉ. गुलेरिया यांनी लक्ष वेधले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयायायांनी दिल्लीत जुलै अखेरपर्यंत पाच लाखांहून अधिक रुग्ण असतील, अशी भीती व्यक्त करीत खळबळ उडविली आहे. तसेच अशा परिस्थतीसाठी तोंड देण्याची तयारी केल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यन्द्र जैन यांनीही दिल्लीत सामुदायिक संक्रमण झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान देशात या साथीच्या बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बरे होणारे रुग्ण आणि सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या जवळजवळ समसमान झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ४८.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात १,३५, २०५ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.