इरबिल – इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान प्रांताच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘पेशमर्गा’ आणि तुर्कीने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या ‘पीकेके’ या कुर्दांच्या दोन गटात संघर्ष सुरू आहे. कुर्दिस्तानच्या पंतप्रधानांनी पेशमर्गावरील या हल्ल्याची कडक शब्दात निंदा केली. तर अमेरिका व मित्रदेशांनी ‘पीकेके’च्या या हल्ल्यांचा निषेध करावा, अशी मागणी कुर्दिस्तानच्या सरकारने केली. दरम्यान, ‘पीकेके’शी संलग्न असलेली सिरियातील ‘वायपीजी’ या कुर्द संघटनेला अमेरिकेचा पाठिंबा आहे. त्यामुळे कुर्दांमधील या वादात अमेरिका काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
इराक, इराण, तुर्की, सिरिया आणि आर्मेनिया या देशांमध्ये विखुरलेले कुर्दवंशिय स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून यासाठी इराक व सिरियातील कुर्दवंशियांनी संघर्ष तीव्र केला आहे. इराकमधल्या कुर्दवंशियांनी आपली बहुसंख्या असलेला भाग कुर्दिस्तान घोषित केला असून या प्रांतावर कुर्दांचे स्वायत्त सरकार राज्य करीत आहे. तसेच या प्रांताच्या सुरक्षेची जबाबदारी इराकी सैनिकांवर नसून ‘पेशमर्गा’ या कुर्दांच्या सशस्त्र गटाकडे आहे. ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटनेला पिटाळून लावणारी आणि चिवटपणे झुंज देणारी संघटना म्हणून ‘पेशमर्गा’चा उल्लेख केला जातो.
गेल्या काही दिवसांपासून पेशमर्गाच्या जवानांवर सिरियाच्या सीमाभागातून हल्ले सुरू आहेत. ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) आणि ‘पिपल्स प्रोटेक्शन युनिट्स’ (वायपीजी) या कुर्दांच्याच संघटनांकडून हे हल्ले सुरू आहेत. ‘पीकेके’ आणि ‘वायपीजी’च्या जवानांना इराकमध्ये प्रवेश हवा आहे व पेशमर्गा त्याला विरोध करीत आहेत. यामुळे दोन्ही कुर्द गटांमध्ये हा संघर्ष पेटला असून यामध्ये दोन जवानांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.
यानंतर पेशमर्गा आणि पीकेके-वायपीजी गटांमध्ये गोळीबार सुरू असून आंतरराष्ट्रीय समुदायाने हा संघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन इराकच्या कुर्दिस्तानमधील सरकारने केले आहे. सिरियातील पीकेके-वायपीजी या कुर्द संघटनांना अमेरिकेचा पाठिंबा आहे. अमेरिकेने सिरियातील ‘आयएस’च्या विरोधातील संघर्षात या दहशतवादी संघटनांचे सहाय्य घेतले होते. अमेरिका आणि पीकेके मधील सहकार्यावर तुर्कीने टीका केली होती.
सिरियातील ‘पीकेके-वायपीजी’साठी इराकच्या सीमा बंद करण्यासंबंधी पेशमर्गा आणि तुर्कीची हातमिळवणी झाल्याचे बोलले जाते. पेशमर्गा आणि तुर्कीने इराकच्या उत्तरेकडील सीमाभागात सुरक्षा चौक्या आणि नवे तळ प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे पीकेके-वायपीजीच्या कुर्दांसाठी उत्तरेकडील सीमारेषा खुली केल्यास आपल्या सुरक्षा चौक्या व नवे तळ यांची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता तुर्कीला सतावित आहे. त्यासाठी तुर्कीने पेशमर्गाशी सहकार्य सुरू केल्याने कुर्दवंशिय संघटनांमध्येच संघर्ष पेट घेत असल्याचे दिसत आहे.