पाकिस्तानातून चीनमध्ये निघालेल्या जहाजातील किरणोत्सर्गी पदार्थांचे कंटेनर भारतीय यंत्रणांनी गुजरातजवळ जप्त केले

किरणोत्सर्गीनवी दिल्ली – ‘नॉन हॅझार्डिअस’ पदार्थांच्या नावाखाली सूचीबद्ध करून पाकिस्तानातून चीनकडे पाठविण्यात येत असलेल्या धोकादायक पदार्थांच्या कंटेनर्सना भारतीय यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. या कंटेनर्समध्ये किरणोत्सर्गी घटक असल्याचे वृत्त आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात गुजरातच्या कांडला बंदराजवळ चीनमधून पाकिस्तानात जात असलेले असेच एक मालवाहू जहाज भारतीय यंत्रणांनी जप्त केले होते. या जहाजावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसाठी व अण्वस्त्रांसाठी वापरले जाणारे साहित्य असल्याचे उघड झाले होते. चीनने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भारताने या जहाजावरील साहित्य ताब्यात घेतले. तर या वर्षी सप्टेंबर महिन्यात यासंदर्भातील तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हाती घेतला होता. यानंतर पुन्हा एकदा चीन-पाकिस्तानदरम्यान आंतरराष्ट्रीय नियमांना धाब्यावर बसवून व्यापाराच्या आडून होत असलेल्या गैरप्रकाराचा भांडाफोड भारतीय यंत्रणांनी केला आहे.

सीमाशुल्क आणि डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) या दोन्ही विभागांनी कारवाई करीत एका परदेशी जहाजातून मोठ्या प्रमाणावर कंटेनर्स ताब्यात घेतले. भर समुद्रात ही कारवाई करण्यात आली. ‘नॉन हॅझार्डिअस’ अर्थात धोकादायक साहित्य कंटेनरमध्ये नसल्याचे यंत्रणांना सांगण्यात आले होते. त्यानुसार या जहाजाला भारतीय सागरी सीमेतून जाण्याची परवानगी मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात या जहाजात धोकादायक साहित्य असल्याची माहिती भारतीय यंत्रणांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या परदेशी जहाजावरील कंटेनर्स ताब्यात घेऊन ते मुंद्रा बंदरात आणून उतरविण्यात आले. या जहाजावर हॅझार्ड-श्रेणी ७ प्रकारचे घटक असून ते किरणोत्सर्गी असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय बंदरात हे सामान उतरणार नव्हते. हे कंटेनर पाकिस्तानच्या कराची बंदरात चढविण्यात आले होते आणि चीनच्या शांघाय बंदरात हा माल उतरविण्यात येणार होता. मात्र मार्गातच हा माल भारतीय यंत्रणांनी जप्त केला आहे. अदानी पोर्टनेही यासंदर्भात स्पष्टीकरण देताना हे कंटेनर्स मुंद्रा पोर्टमध्ये उतरणार नव्हते, असे स्पष्ट केले आहे. अदानी पोर्ट सेझकडून सीमाशुल्क व डीआरआयच्या अधिकार्‍यांना सहकार्य करण्यात येत असल्याचे अदानी पोर्टने म्हटले आहे. तसेच भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी या यंत्रणा करीत असलेल्या कामाला आम्ही सॅल्यूट करतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही अदानी पोर्टने स्पष्ट केले.

दोनच महिन्यांपूर्वी मुंद्रा पोर्टमध्ये तीन हजार किलो इतका प्रचंड हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला होता. या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २१ हजार कोटी रुपये इतकी होती. टॅल्कम पावडरच्या नावाखाली हे अमली पदार्थ आंध्र प्रदेेशातील एका कंपनीने अफगाणिस्तानातून इराणमधील बंदराद्वारे भारतात मागविले होते. ही कारवाई डीआरआयनेच केली होती. यामध्ये टेरर फंडिंगची शक्यता असल्याने हा तपास सध्या एनआयए करीत आहे. त्यानंतर गुजरातमध्ये डीआरआयने केलेली आणखी एक मोठी कारवाई आहे.

दरम्यान, गेल्यावर्षीही भारताने चीनमधून पाकिस्तानात जात असलेले ‘दाई कुई युन’ हे एका चिनी कंपनीचे जहाज ताब्यात घेतले होते. या जहाजावर अण्वस्त्रांसाठी लागणारे साहित्य होते. भारतातील डीआरडीओसारख्या संस्थांच्या पथकाने पाहणी करून याबाबतची पुष्टी दिल्यावर हे सर्व सामान भारताने जप्त केले होते. त्यावेळी चीनने या जहाजावरील साहित्य हे औद्योगिक वापरासाठीच असल्याचे, तसेच यामध्ये काहीही बेकायदेशीर नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. चीन जबाबदार देश असून चीनने अण्वस्त्र प्रसारबंदीचे उल्लंघन केलेले नाही, असेही चीनने म्हटले होते. मात्र चीनची ही मूळमुळीत प्रतिक्रिया चीनच्या हेतूबद्दल संशय वाढविणारी होती. चीन कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करीत आहे, हे भारताने या कारवाईतून जगासमोर आणले होते. तर शुक्रवारी पुन्हा एकदा भारतीय यंत्रणांनी चीन-पाकिस्तान या दुकलीकडून सुरू असलेला गैरप्रकार या कारवाईतून उघड केला आहे.

leave a reply