इस्लामाबाद – नव्या लष्करप्रमुखांचे नाव व सोबत इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या बढतीची यादी घेऊन पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे गेले. मात्र पंतप्रधान शरीफ यांनी आपल्याला नियुक्त्या मान्य नसल्याचे सांगून या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या या लष्करी अधिकाऱ्याने तिथल्या तिथेच पाकिस्तानच्या पंतप्रधांना थोबाडले. या माराच्या खाणाखुणा चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना काही दिवस तोंड लपवून रहावे लागल्याचा दावा या देशातील पत्रकार करीत आहेत. तर सरकारच्या विरोधात खडे ठाकलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते यावर जल्लोष करीत आहेत. याआधी पंतप्रधानपदावर असताना इम्रान खान यांच्याबाबतही असाच प्रकार झाला होता, हे लक्षात आणून देऊन कानशीलात बसणाऱ्यांचे गाल बदलले तरी हात एकच आहे, हे विसरू नका, असे पाकिस्तानचे पत्रकार इम्रान खान यांच्या पक्षाला बजावत आहेत.
लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. पण पाकिस्तानचा नवे लष्करप्रमुख कोण असतील, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. पंतप्रधान शाहबाज शरीफ व त्यांचे बंधू आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आपल्या मर्जीतले अधिकारी लष्करप्रमुखपदावर बसवायचे आहेत. मात्र पाकिस्तानचे लष्कर व या देशाची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयची यादी यापेक्षा वेगळी आहे. हे मतभेद टोकाला पोहोचले असून पंतप्रधान शरीफ यांच्यावर संतापलेल्या पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याने त्यांना मारहाण केल्याच्या बातम्या पाकिस्तानात धुमाकूळ घालत आहेत. या बातम्यांना दुजोरा मिळालेला नसला, तरी या देशातील पत्रकारांनी यावरून लष्करावर जोरदार टीका सुरू केली आहे. यामध्ये सध्याच्या सरकारला कडाडून विरोध करणाऱ्या पत्रकारांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चपराक बसली म्हणून जल्लोष करणाऱ्या इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना या पत्रकारांनी चांगलेच फटकारले.
आयएसआयच्या प्रमुखपदावर कुणाची नियुक्ती करायची, यावर लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्याशी मतभेद झाल्याने इम्रान खान यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते. आत्ताच्या पंतप्रधानांप्रमाणे त्यांनाही लष्करी अधिकाऱ्यांचा मार खावा लागला होता, याची आठवण या पत्रकारांनी करून दिली. त्यामुळे पाकिस्तानचे सर्वाधिकार अवैधरित्या केंद्रीत असलेल्या लष्कराला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करा, आज दुसऱ्या नेत्यांना मार पडत आहे म्हणून खूश होऊ नका, असा इशारा या पत्रकारांनी इम्रान खान व त्यांच्या समर्थकांना दिला आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीच इम्रान खान यांचे सरकार पाडून त्यावेळच्या विरोधी पक्षनेत्यांना एकत्र आणून संयुक्त सरकार स्थापन केले होते. यानंतर पाकिस्तानच्या लष्करावर इम्रान खान यांनी गंभीर आरोप केले. आपल्यावर झालेल्या गोळीबारामागेही लष्कराचा हात असल्याचा ठपका इम्रान खान यांनी ठेवला होता. तसेच या हल्ल्यानंतर थांबलेला आपला लाँग मार्च नव्याने सुरू करण्याची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे. 26 नोव्हेंबर रोजी सर्वांनाच चकीत करणारी घोषणा आपण करणार असल्याचे इम्रान खान यांनी जाहीर करून टाकले.
यामुळे नव्या लष्करप्रमुखाच्या नेमणुकीवरून सरकार आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मतभेदांचा लाभ घेण्याची तयारी इम्रान खान यांनी केल्याचे दिसत आहे. मात्र याचे विदारक परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील, कारण यामुळे देशात अराजक माजण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पाकिस्तान दिवाळखोर बनण्याची शक्यता बळावली आहे. अशा स्थितीत हे अराजक पाकिस्तानची व्यवस्था कोलमडवून टाकणारे ठरेल, असे इशारे विश्लेषक देत आहेत. मात्र आपले सरकार आल्याखेरीज पाकिस्तानच्या समस्या सुटणार नाहीत, असा दावा करणारे इम्रान खान व त्यांचे समर्थक माघार घेण्याची शक्यता नाही.