सहकारी सोसायट्या आपल्या नावात ‘बँक’ वापरू शकत नाही

- रिझर्व्ह बँक

सहकारी सोसायट्यामुंबई – काही को-ऑपरेटिव्ह सोसायट्या या आपल्या नावामध्ये बँक हा शब्द लावत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांना त्यांच्या नावासमोर ‘बँक’ हा शब्द वापरण्याचा अधिकार नाही. सहकारी सोसायट्यांना कोणत्याही बँकिंग व्यवहारांची परवानगी नाही. सहकारी सोसायट्यांमध्ये जमा रक्कम ‘डिपॉझिट इन्शूरन्स ऍण्ड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन’अंतर्गत (डीआसीजीसी) येत नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. याद्वारे सामान्य नागरिकांना अशा सोसायटीमध्ये बँकींग व्यवहार करताना सतर्क राहण्याचा इशारा आरबीआयने दिला आहे.

बँकिंग रेग्यूलेशन ऍक्ट १९४९ या कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा गेल्यावर्षी २९ सप्टेंबर २०२० पासून लागू झाल्या आहेत. यानुसार सहकारी सोसायट्या आपल्या नावापुढे बँक, बँकर्स किंवा बँकिंग असा कोणताही उल्लेख आपल्या नावासमोर करू शकत नाहीत, असे आरबीआयने लक्षात आणून दिले आहे. तसेच अशा सोसायट्या या सोसायटीचे सदस्य नसलेल्यांकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत. जर या सोसायट्या सदस्य नसलेल्यांकडून ठेवी स्वीकारत असतील, तर तो बँकिंग व्यवहार ठरतो आणि अशा व्यवहारांसाठी आरबीआयने परवानगी दिल्याशिवाय तो करता येत नाही, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

आरबीआयकडे कित्येक सहकारी सोसायट्या आपल्या नावामध्ये बेकायदेशीरपणे बँक शब्दाचा वापर करून जनतेची दिशाभूल करीत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. यानंतर आरबीआयने याबाबत जनतेमध्ये सतर्कता वाढविण्यासाठी ही माहिती जाहीर केली आहे. गेल्या वर्षीपासून बँकिंग कायद्यातील सुधारणा लागू झाल्या आहेत. त्यानंतर सहकारी सोसायट्यांनी नावामध्ये बँक शब्द वापरल्यास बेकायदा ठरते, असे आरबीआयने स्पष्ट केले.

तसेच बँक बुडाल्यास किंवा गैरव्यवहारामुळे ती अडचणीत आल्यास ठेवी व खातेधारकांना विमा संरक्षण मिळत असते. ‘डिपॉझिट इन्शूरन्स ऍण्ड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन’अंतर्गत (डीआसीजीसी) बँकांमधील ठेवींना मिळणारे हे संरक्षण सहकारी सोसायट्यांमधील ठेवींना लागू होत नाही, असेही आरबीआयने अधोरेखित केले आहे. त्यामुळे अशा सहकारी सोसायट्या बँक असल्याचा दावा करीत असतील व ठेवी स्वीकारत असतील तर सावध रहा, असे आवाहन आरबीआयने नागरिकांना केले आहे.

leave a reply