नवी दिल्ली/मुंबई – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनावर मात करून रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या पुन्हा लाखांवर गेली आहे. आठवडाभरापूर्वी हीच सक्रीय रुग्णांची संख्या 77 हजारांपर्यंत खाली आली होती. महाराष्ट्रात शुक्रवारी आठ हजार 67 नव्या रुग्णांची नोंंद झाली, तर केवळ 1760 रुग्ण बरे होऊन परतले. महाराष्ट्रातील ही रुग्णवाढ तिसऱ्या लाटेचे संकेत असल्याचे दावे केले जात आहेत.
गुरुवारच्या दिवसात देशात 16 हजार 764 अधिक कोरोना रुग्ण आढळले होते, 220 जणांचा बळी गेला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत विविध राज्यातून जाहीर झालेली एका दिवसातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता चोवीस तासातील देशभरातील रुग्णसंख्या 20 हजारांवर गेल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात आठ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात आठ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी 5 हजार 428 रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत मुंबईतील नव्या रुग्णांची ही दैनंदिन संख्या 47 टक्क्यांनी वाढली आहे. तर तीन दिवसात हेच प्रमाण दुप्पटीने वाढले आहे.
केरळात 2676, कर्नाटकात 832 आढळले आहेत. दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही आठवड्याभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, भारतात कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 145 लसींसे डोस देण्याचा टप्पा ओलांडला गेला आहे. तसेच विविध राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांकडे 16.94 कोटी लसी सध्या उपलब्ध आहेत. राज्यांना लसीकरण वाढविण्यास सांगण्यात आले आहे. लस न घेतलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून लसीकरणाला वेग द्या, असे आवाहन केंद्र शासनाने केले. आहे.
डेल्टा व्हेरिअंटची जागा ओमिक्रॉन घेऊ लागला
नवी दिल्ली – देशात ओमिक्रॉनची रुग्णांची संख्या 1300 वर पोहोचली आहे. ही संख्या कमी दिसत असली तरी अधिकारी सूत्रांनी रुग्णसंख्येच्या बाबतीत ओमिक्रॉनने डेल्टाची जागा घेण्यास सुरूवात केल्याचा दावा केला आहे. परदेशातून भारतात आलेल्या कोरोनाच्या 80 टक्के रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
देशात 2 डिसेंबरला ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण आढळले होते. तेव्हापासून केंद्र सरकार सतर्क असून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहे. संक्रमणात वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारांना सातत्याने सूचना करण्यात येत आहेत. गुरुवारीही कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्याचे लक्षात आल्यावर राज्यांना कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. जेणेकरून कोरोनाच्या रुग्णांची ओळख पटू शकेल व ओमिक्रॉनचा संसर्ग रोखता येईल.
कोरोना रुग्णांच्या चाचणीचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आल्यावर रुग्णाला कोणत्या व्हेरिअंटची लागण झाली हे स्पष्ट होते. काही ठरावीक नमूनेच जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले जातात. त्यावरून देशात हळूहळू ओमिक्रॉनने रुग्णसंख्येच्या बाबतीत डेल्टाची जागा घेणे सुरू केल्याचे लक्षात आल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. मात्र ओमिक्रॉन व्हेरिअंटची जेवढे रुग्ण आढळले आहेत, त्यातील एक तृतियांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आणि बाकीच्यामध्ये लक्षणे दिसून आली नसल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.