वॉशिंग्टन – जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७२ लाखांवर गेली असून २४ तासात त्यात एक लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. कोरोना साथीत दगावणाऱ्यांची संख्या चार लाखांहून अधिक असून २४ तासात अडीच हजारांहून जास्त बळींची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, लॉकडाउनच्या निर्णयामुळे अमेरिकेत सहा कोटी नागरिक साथीची लागण होण्यापासून बचावल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
जगभरात कोरोना साथीत बळी गेलेल्यांची एकूण संख्या ४,०९,७२४ झाली असून २४ तासांमध्ये २,६५६ जणांची भर पडली आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या ७२,४५,८२७ झाल्याची माहिती ‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिली आहे. यात अमेरिकेतील २० लाखांहून अधिक रुग्णांचा समावेश आहे. अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७,११,६९६ झाली आहे. २४ तासात ब्राझीलमध्ये १५,६५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
ब्राझीलमध्ये एकूण ३७,३१२ जण कोरोनाच्या साथीत दगावले असून २४ तासात नव्या ६७९ बळींची नोंद झाली आहे. आग्नेय आशियातील इंडोनेशियामध्ये २४ तासांमध्ये १,०४३ नवे रुग्ण आढळले असुन आतापर्यंत ची सर्वात मोठी वाढ ठरली आहे. इंडोनेशियातील एकूण रुग्णांची संख्या ३३,०७६ झाली आहे.
दरम्यान, ब्रिटनच्या इंपिरियल कॉलेज ने कोरोनाबाबत नवा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात लॉकडाउनच्या निर्णयामुळे अमेरिकेत सहा कोटी नागरिकांना साथीची लागण झाली नाही, अशी माहिती दिली आहे. ब्रिटनमधील पाच लाख जण साथीची लागण होण्यापासून बचावले असेही अहवालात सांगण्यात आले.