नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे. केवळ तीन दिवसात देशात कोरोनाचे एक लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी दिवसभरात देशात सुमारे ३९ हजार नवे रुग्ण आढळले होते. तर रविवारीही दिवसभरात देशात तितक्याच नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातच एका दिवसात ९,५१८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २५८ जण दगावले आहेत. देशात या साथीच्या बळींची संख्या २७ हजारांवर गेली आहे.
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) देशात कोरोनाच्या साथीच्या ‘कॉम्युनिटी ट्रांसमिशन’ अर्थात सामुदायिक संक्रमणाला सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. देशातील वाढत्या रुग्णसंख्येवरुन ही बाब स्पष्ट होते. ग्रामीण भागातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची गोष्ट असल्याचे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा म्हणाले. सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अरविंद कुमार यांनीही या दाव्याचे समर्थन केले आहे.
देशात सामुदायिक संक्रमणाच्या या दाव्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी देशात ३९,९०२ रुग्ण आढळले होते. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १० लाख ७७ हजारांच्या पुढे पोहोचली होती. रविवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीची रुग्णसंख्या ११ लाखांच्या पुढे गेली. महाराष्ट्रात चोवीस तासात साडे नऊ हजाराहून अधिक रुग्ण आढळले. मुंबईत ४६ जणांचा बळी गेला आणि १०४६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत दिवसभरात ७८ जणांचा बळी गेला आणि ४९७९ नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या तीन लाखांच्या पुढे, तर तामिळनाडूतील रुग्णसंख्या एक लाख ७० हजारांवर पोहोचली आहे.
आंध्र प्रदेशात एका दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येने उच्चांक नोंदविला आहे. या राज्यात तब्बल दिवसभरात ५६ जणांचा बळी गेला असून ५,०४१ नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात ९१ कोरोना रुग्ण चोवीस तासात दगावले, तर ४ हजार १२० नवे रुग्ण आढळले. उत्तरप्रदेशात दोन हजाराहून अधिक रुग्णांची, तर बिहारमध्ये १२०० हुन अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तेलंगणात १२९६ नवे रुग्ण आढळले आहेत.