वॉशिंग्टन – अमेरिकेसह युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या साथीने उडविलेला हाहाकार कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. अमेरिकेत बुधवारी व गुरुवारी 48 तासांच्या अवधीत कोरोनाचे 11 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णांमध्ये 26 टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी युरोपिय देशांमध्येही कोरोनाचे थैमान सुरू असून पूर्व युरोपिय देशांमध्ये कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या 10 लाखांवर गेली आहे. रशियात कोरोना बळींची संख्या साडेसहा लाखांवर गेल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली असून, सर्वाधिक बळींच्या यादीत रशिया अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे म्हटले आहे.
गेल्या महिन्यात आफ्रिकेतून समोर आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे कोरोना साथीची व्याप्ती भयावह प्रमाणात वाढत असल्याचे उघड झाले आहे. अमेरिका व युरोपिय देशांना याचा सर्वाधिक फटका बसला असून या देशांमध्ये सातत्याने रुग्णसंख्या व बळींचे नवे विक्रम नोंदविले जात आहेत. अमेरिकेतील स्थिती अधिकाधिक बिघडत असल्याचे गेल्या दोन दिवसांमधील आकडेवारीतून समोर आले.
बुधवारी अमेरिकेतील रुग्णसंख्येने अवघ्या 24 तासांमध्ये पाच लाख रुग्णांची मर्यादा ओलांडली होती. गुरुवारी त्यात तब्बल 26 टक्क्यांची भर पडली आहे. गुरुवारी 24 तासांमध्ये अमेरिकेत कोरोनाचे सहा लाख, 47 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. गेल्या सात दिवसांमध्ये अमेरिकेत सुमारे 25 लाख रुग्ण आढळले असून ही एका आठवड्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. रुग्णांच्या संख्येत लाखांची भर पडत असतानाच, प्रतिदिनी दगावणाऱ्ांची संख्याही दीड हजारांच्या नजिक असल्याची माहिती देण्यात आली.
अमेरिकेपाठोपाठ युरोपिय देशांमध्येही कोरोनाचे संकट वाढत असून ब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांमध्ये 24 तासात सरासरी एक ते दोन लाख रुग्ण आढळत आहेत. तर पूर्व युरोपात ओमिक्रॉन व्हेरिअंट ‘डॉमिनंट स्ट्रेन` म्हणून समोर येउ लागला आहे. गुरुवारी पूर्व युरोपिय देशांमधील कोरोनाच्या बळींच्या संख्येन 10 लाखांचा टप्पा पार केल्याचे सांगण्यात आले. तर रशियामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कोरोनामुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. रशियाने सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझिलला मागे टाकल्याचे वृत्त ‘रॉयटर्स` या वृत्तसंस्थेने दिले आहे. रशियातील बळींची संख्या साडेसहा लाखांवर गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात सुमारे एक लाख जण दगावल्याचे यात सांगण्यत आले.