जगभरात हाहाकार माजविणार्‍या कोरोना साथीची सुरुवात चीनमधूनच झाली

- ‘डब्ल्यूएचओ’ पथकातील ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांची माहिती

साथीची सुरुवातबीजिंग – गेल्या वर्षी जगभरात फैलावलेल्या व अजूनही हाहाकार उडविणार्‍या कोरोना साथीची सुरुवात चीनमधूनच झाली व त्याच्या प्रसारासाठी वुहानमधील प्राण्यांची बाजारपेठ कारणीभूत ठरली, अशी माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (डब्ल्यूएचओ)वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिली. ‘डब्ल्यूएचओ’चे पथक गेल्या महिन्यात कोरोना साथीबाबत चौकशी करण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले होते. या पथकाचा भाग असणारे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉमनिक ड्वायर यांनी, कोरोनाचा उगम व प्रसार चीनमध्येच झाल्याची माहिती दिली. त्याचवेळी पथकाचे प्रमुख असणारे पीटर एम्बारेक यांनी चिनी अधिकार्‍यांसह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत साथीचे नक्की मूळ सांगता येणार नसल्याचा दावा केला आहे.

जगभरातील प्रमुख वैज्ञानिक, संशोधन संस्था, रिसर्च जर्नल्स व अभ्यासगटांनी कोरोनाच्या साथीचा उगम चीनमध्येच झाल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट हे वास्तव सातत्याने नाकारत आहे. गेल्या वर्षभरात चीनच्या यंत्रणांनी चार ते पाच वेगवेगळे देश व स्रोतांमधून कोरोना साथीची सुरुवात झाल्याचे अवास्तव दाव केले होते. पण त्याबाबत ठोस माहिती तसेच पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे ‘डब्ल्यूएचओ’चा गेल्या महिन्यातील चीन दौरा महत्त्वाचा मानला जात होता.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची साथ फैलावण्यास सुरुवात झाल्यानंतर जगभरातील प्रमुख देशांनी चीनमध्ये तातडीने पथक पाठवून चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र चीनने कोरोनाची सुरुवात आपल्याकडे झालेलीच नाही, असे सांगून चौकशीला परवानगी नाकारली होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव वाढविल्यानंतर ‘डब्ल्यूएचओ’ला आंतरराष्ट्रीय चौकशीचा प्रस्ताव मान्य करणे भाग पडले होते. त्याची मुदत व व्याप्ती ठरविण्यासाठीही वेळकाढूपणा करण्यात आला आणि जानेवारी महिन्यात ‘डब्ल्यूएचओ’चे पथक चीनमध्ये दाखल झाले. दाखल झाल्यानंतरही या पथकातील काहींना माघारी पाठविण्यात आले तर इतरांवर ‘क्वारंटाईन’ होण्याची सक्ती करण्यात आली.

या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ कुठे भेट देते व काय अहवाल देते यावर अनेकांची नजर होती. चीनच्या राजवटीने आर्थिक व राजनैतिक दडपण आणून ‘डब्ल्यूएचओ’चे नियंत्रण आपल्या हातात घेतल्याचे आरोप गेली दोन वर्षे सुरू होते. मंगळवारी कोरोनासंदर्भात जाहीर केलेल्या अहवालाने त्याला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला. ‘डब्ल्यूएचओ’चे पथक व चीन यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत, कोरोनाव्हायरस नक्की कुठून आला आणि मानवी संसर्ग कसा सुरू झाला, याबद्दल ठोस निष्कर्ष मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. त्याबद्दल चार वेगवेगळ्या शक्यता असल्याचे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या पथकाकडून सांगण्यात आले. मात्र त्यातील वुहान लॅबमधून व्हायरसचा प्रसार झाला असावा, ही शक्यता ‘डब्ल्यूएचओ’च फेटाळून लावत असल्याचा दावा पथकाचे प्रमुख पीटर एम्बारेक यांनी केला. पीटर एम्बारेक यांच्या दाव्यांवर पथकातील एक प्रमुख शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉमनिक ड्वायर यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. त्याचवेळी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमध्येच असून, वुहानमधील ‘सीफूड मार्केट’मधूनच त्याची साथ फैलावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाव्हायरसशी संबंधित इतर साथींमध्ये ‘वटवाघुळ’ हा समान धागा होता आणि नव्या विषाणूमागेही तेच मूळ असण्याची शक्यता सर्वाधिक आहे, असे प्राध्यापक डॉमनिक ड्वायर यांनी सांगितले. यापूर्वी आलेल्या ‘मर्स’ व ‘सार्स’सारख्या साथींमध्ये वटवाघळातून मानवी संसर्ग पसरल्याचे दिसून आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी चीनने कोरोनाच्या साथीची माहिती जगाला देण्यापूर्वी खूप दिवस आधी साथ चीनमध्ये फैलावण्यास सुरुवात झाली होती, असा दावाही ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला. प्राध्यापक डॉमनिक ड्वायर हे जगातील आघाडीचे ‘मायक्रोबायोलॉजिस्ट’ व ‘इन्फेक्शिअस डिसिज एक्सपर्ट’ असल्याने त्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

ब्रिटनमधील आरोग्य क्षेत्रातील आघाडीचे पत्रकार जॉन नैश यांनी, ‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालावर कडक ताशेरे ओढले आहेत. कोरोना वुहान लॅबमधून पसरला नाही, हे सांगणारी ‘डब्ल्यूएचओ’ चीनने उभ्या केलेल्या गोंधळात त्यांचीच थुंकी चाटणारी साक्षीदार आहे, असा टोला नैश यांनी लगावला. ‘डब्ल्यूएचओ’च्या तोंडून कोरोनाबाबत सांगण्यात आलेल्या शक्यता म्हणजे हुकुमशहांकडून वापरण्यात येणार्‍या जुन्या क्लृप्तीचा भाग असल्याची टीकाही ब्रिटीश पत्रकारांनी केली.

leave a reply