वॉशिंग्टन/लंडन – कोरोनाची साथ अमेरिकेत वेगाने फैलावत असून देशातील बळींची संख्या सहा लाखांपर्यंत जाऊ शकते, अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. सध्या अमेरिकेतील साथीची तीव्रता कमी करण्यासाठी काहीही करता येण्यासारखे नाही, असा दावाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या साथीविरोधात युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे संकेत दिले असून त्यासाठी ‘नॅशनल स्ट्रॅटेजी’ची घोषणा केली. यावेळी त्यांनी पुढील १०० दिवसात १० कोटी अमेरिकी नागरिकांचे लसीकरण ठेवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट केले.
अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी ४६ लाखांच्या वर गेली असून दरदिवशी सुमारे दीड ते दोन लाख रुग्णांची नोंद होत आहे. त्याचवेळी कोरोनामुळे दगावणार्यांची संख्या चार लाख १० हजारांवर गेली असून दररोज सरासरी साडेतीन हजारांहून अधिक जणांचा बळी जात आहे. गेल्या ३६ दिवसात अमेरिकेत एक लाखांहून अधिक बळींची नोंद झाल्याची माहिती ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने दिली आहे. या पार्श्वभूमीवर नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी वर्तविलेले भाकित लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर २४ तासांमध्ये कोरोना साथीसंदर्भात विशेष धोरण जाहीर केले. ‘नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर द कोविड-१९ रिस्पॉन्स अॅण्ड पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस’ असे याच नाव असून त्यासाठी एक ट्रिलियन डॉलर्सहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नव्या धोरणाअंतर्गत पुढील १०० दिवसांमध्ये १० कोटी अमेरिकी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. साथीवर मात करण्यासाठी आवश्यक असणार्या वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढविण्यात येणार असून, कोरोनाच्या चाचण्या व इतर संबंधित गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जवळपास ८० लाख अमेरिकी नागरिकांना अर्थसहाय्य पुरविण्यात येणार असल्याची माहितीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिली.
अमेरिकेतील कोरोनाची साथ रोखण्यासाठी योजना सादर करणार्या बायडेन यांनी, जगातील गरीब देशांना लस पुरविण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेत अमेरिका सहभागी होणार असल्याचेही जाहीर केले आहे. यासंदर्भातील स्वतंत्र अध्यादेशही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जारी केल्याची माहिती अमेरिकी अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी, देशात आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार मूळ कोरोनाव्हायरसपेक्षा अधिक घातक असल्याचा इशारा दिला आहे. ‘लंडन व इंग्लंडच्या दक्षिण भागात आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार वेगाने पसरण्याबरोबरच अधिक प्राणघातकही ठरत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आरोग्यव्यवस्थेवर असलेले दडपण अधिक वाढले आहे’, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी बजावले. ब्रिटनमधील कोरोनाच्या बळींची संख्या ९६ हजारांनजिक पोहोचली असून ३५ लाखांहून अधिक जणांना संसर्ग झाल्याची माहिती देण्यात आली आहे.