लंडन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसच्या साथीत ब्रिटनमध्ये ४३९ जणांचा बळी गेला असून या देशात एकूण बळींची संख्या ५३०० च्या पुढे गेली आहे. युरोपातील इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांच्या तुलनेत ब्रिटनमध्ये या साथीची संख्या कमी आहे खरी पण युरोपातील या साथीचे सर्वाधिक बळी ब्रिटनमध्येच जातील, असा दावा अमेरिकेतील अभ्यासगटाने केला आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना या साथीची लागण झाली असून सध्या त्यांना ‘आयसीयू’मध्ये ठेवले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीने ५३८५ जणांचा बळी गेला असून या देशात या साथीचे ५१,६०८ रुग्ण आहेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना सोमवारी तातडीने ‘सेंट थॉमस’ रुग्णालयात ‘अतिदक्षता विभागा’त (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान जॉनसन यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. तर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
इटली, स्पेन आणि फ्रान्स तसेच जर्मनी या देशांच्या तुलनेत ब्रिटनमधील बळींची तसेच रुग्णांची संख्या कमी असल्याचे बोलले जाते. पण इतर युरोपिय देशांच्या तुलनेत ब्रिटनमध्ये या साथीचा फैलाव उशिरा सुरू झाल्याचे ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्यॅल्युएशन’ (आयएचएमइ) या अमेरिकी अभ्यासगटाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
‘आयएचएमइ’ या अमेरिकी अभ्यासगटाने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माहितीचे संकलन, त्याचबरोबर चीन, इटली आणि अमेरिकेतील मृत्यूदराचा अभ्यास करुन ब्रिटनला याबाबतचा इशारा दिला. ब्रिटनमधील या साथीचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलली नाही तर, जुलै महिन्यापर्यंत ब्रिटनमध्ये ६६,००० जणांचा बळी जाऊ शकतो, असे या अभ्यासगटाने म्हटले आहे. तर इटलीमध्ये २०,०००, स्पेनमध्ये १९,००० आणि फ्रान्समध्ये १५,००० जण दगावतील, अशी शक्यता या अभ्यासगटाने वर्तविली आहे. सध्या इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असली तरी, नजिकच्या काळात यात घट होईल, अशी शक्यता अमेरिकी अभ्यासगटाने वर्तविली. मात्र ब्रिटनमधील बळींची संख्या ६६,००० वर जाईल असे सांगून या अभ्यासगटाने ब्रिटीश सरकारच्या चिंता वाढविल्या आहेत.
दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या ब्रिटनमधील वाढत असलेल्या फैलावासाठी चीन जबाबदार असल्याची भावना ब्रिटीश जनतेमध्ये व्यक्त होऊ लागल्या आहेत. चिनविरोधी या संतापाचे पडसाद ब्रिटनच्या काही भागात उमटू लागले आहेत. या साथीचा फैलाव ‘५-जी’च्या नेटवर्क टॉवरमधून होत असल्याचा वीडियो ब्रिटनमध्ये व्हायरल झाला आहे. याला विज्ञानाचा आधार नाही किंवा कुठल्याही संशोधकाने याला दुजोरा दिलेला नाही. तरीही ब्रिटनच्या जनतेचा संताप कमी झाला नाही. या सर्वामागे चीन असल्याचे मेसेज ब्रिटनमध्ये व्हायरल झाल्यानंतर संतप्त जमावाने बर्मिंगहॅम, लिवरपूल आणि मेलींग या भागात ‘५-जी’ टॉवर पेटवून दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.