तेहरान/इस्तंबूल – कोरोनाव्हायरसने इराण, तुर्कीसह आखाती देश आणि आफ्रिका खंडात घातलेल्या थैमानात ९००० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. गेल्या चोवीस तासात या साथीने तुर्कीमध्ये १२१ तर इराणमध्ये ७३ जण दगावले आहेत. याबरोबर इराण, तुर्कीसह आखात आणि आफ्रिका खंडातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या दोन लाखांजवळ पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात एकट्या तुर्कीमध्ये ३७८३ कोरोना रूग्ण आढळले आहेत. आफ्रिकन देशांमधल्या ५४ पैकी ५२ देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढला असून २० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आखाती क्षेत्रात तुर्की व इराणमध्ये कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक फैलाव दिसून येत आहे. यापैकी तुर्कीमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीत १८९० जणांचा बळी गेला आहे. याशिवाय आखाती देशांमध्ये तुर्कीतील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीमध्ये एकूण कोरोना रूग्णांची संख्या ८२,३२९ झाली आहे, अशी माहिती तुर्कीचे आरोग्यमंत्री फहार्टिन कोका यांनी दिली.
शनिवारी इराणमध्ये या साथीत ७३ जण दगावले. आता इराणमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीतील बळींची संख्या ५,११८ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात इराणमध्ये १३७४ कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ८०,८६० झाली आहे. या रूग्णांमध्ये ५७ हजारहून अधिक जण बरे झाल्याचा दावा इराण करीत आहे. त्यामुळे इराणमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रभाव कमी होत असल्याचा दावा इराणचे आरोग्य मंत्रालय करीत आहे. त्याचबरोबर इराणने शनिवारपासून राजधानी तेहरानमधील लॉकडाउन काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत शनिवारी या साथीत कमी जणांचा बळी गेल्याचे इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कियानौस यांनी म्हटले आहे. पुढील काही दिवसांत ही संख्या अजून घटेल, असा दावाही कियानौस यांनी केला आहे. तुर्की व इराणबरोबर सौदी अरेबिया, इजिप्त, इराक या आखाती देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये इजिप्त २२४, सौदी अरेबिया ९२, संयुक्त अरब आमिरात ३७, इराक या देशांमध्ये ८२ जणांचा बळी गेला आहे.
आफ्रिका खंडात या साथीने १००० हून अधिक जणांचा बळी घेतला असून येथील देशांमध्ये १९,८०० कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत, अशी माहिती आफ्रिका रोगनियंत्रण आणि बचाव केंद्राने दिली. शनिवारी नायजेरियाचे संरक्षणदल प्रमुख अब्बा कयारी यांचा कोरोनाने बळी घेतला. नायजेरियातली ही हायप्रोफाईल केस असल्याने खळबळ उडाली आहे.
आफ्रिका खंडात मृतांच्या संख्येत ६० टक्क्यांनी तर कोरोना रूग्णांच्या संख्येत ५१ टक्के वाढ झाल्याचे म्हटले होते. आफ्रिका खंडातील बऱ्याच देशांमध्ये अपुऱ्या आरोग्य सुविधा आहेत. त्यामुळे या देशांमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीतील बळींची संख्या वाढेल अशी भीती काही दिवसांपूर्वीच व्यक्त करण्यात आली होती.