हिंदी महासागर क्षेत्राच्या हितसंबंधांविरोधात कारवाई करणार्‍या देशांना रोखायलाच हवे

- भारताच्या नौदलप्रमुखांचा इशारा

पणजी – हिंदी महासागर क्षेत्राच्या हितसंबंधांविरोधात वैरभावातून कारवाया करणार्‍या देशांच्या कारवाया त्वरित रोखणे अत्यावश्यक ठरते. यासाठी कारवाई करण्याची सज्जता ठेवायला हवी, याची जाणीव भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग यांनी करून दिली. थेट नामोल्लेख न करता, ‘गोवा मेरिटाईम कॉन्क्लेव्ह-२०२१’मधील आपल्या व्याख्यानात नौदलप्रमुखांनी हिंदी महासागर व त्या पलिकडील क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांचा धोका अधोरेखित केला. भारत, श्रीलंका व मालदीव यांनी हिंदी महासागर क्षेत्रात सुरू केलेल्या सहकार्याचा यावेळी नौदलप्रमुखांनी ठळकपणे उल्लेख केला.

हिंदी महासागर क्षेत्राच्या हितसंबंधांविरोधात कारवाई करणार्‍या देशांना रोखायलाच हवे - भारताच्या नौदलप्रमुखांचा इशाराहिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्रातील देशांच्या नौदलांचा समावेश असलेली परिषद गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने आयोजित केलेली ‘गोवा मेरिटाईम कॉन्क्लेव्ह-२०२१’ तीन दिवस सुरू असून त्यासाठी १२ देशांच्या नौदलाचे प्रमुख दाखल झाले आहेत. या देशांमध्ये भारतासह सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मॉरिशस, मालदीव, मादागास्कर, कोमोरोस व सेशल्सचा समावेश आहे.

गोव्यातील ‘नेव्हल वॉर कॉलेज’मध्ये होणार्‍या या परिषदेस भारताच्या नौदलप्रमुखांव्यतिरिक्त संरक्षण तसेच परराष्ट्र विभागाचे सचिवही उपस्थित होते. यावेळी नौदलप्रमुखांनी चीनचे थेट नाव न घेता त्याच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख केला. ‘खुल्या, मुक्त व सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक तसेच हिंदी महासागर क्षेत्राच्या विरोधात काही देश कारवाया करीत आहेत. या गोष्टीमाहित झाल्या की त्या देशांना त्यांच्या कारवाया चुकीच्या आहेत याची जाणीव करून द्यावी लागेल. आपण सर्वांनी सागरी क्षेत्रासाठीची समान उद्दिष्टे निश्‍चित केली आहेत. त्यामुळे पुढे एकत्र येऊन कारवाई करु शकतो’, असे नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग म्हणाले.

यावेळी नौदलप्रमुखांनी तालिबान व ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटनांकडून सागरी मार्गाने सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीचाही उल्लेख केला. त्याविरोधात कारवाईसाठी भारताने श्रीलंका व मालदीवसारख्या इतर देशांच्या सहाय्याने मोहीम सुरू केल्याचेही ऍडमिरल करमबिर सिंग यांनी सांगितले. परिषदेस उपस्थित असलेले भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनीही नाव न घेता हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या आक्रमक हालचालींवर निशाणा साधला. आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रती निष्ठा न ठेवणार्‍या देशांकडून हिंदी महासागर क्षेत्राचे वाढते लष्करीकरण सुरू आहे, असा टोला भारताच्या परराष्ट्र सचिवांनी लगावला.

भारताचे संरक्षणसचिव अजय कुमार यांनी भारतीय नौदलाच्या कामगिरीची प्रशंसा करीत हिंदी महासागर क्षेत्रातील देशांना भारत संरक्षणसाहित्य व इतर मदत देत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

leave a reply