देश चारशे अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठणार

- केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली – देश 400 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य साधण्याजवळ पोहोचत आहे, असे सांगून व्यापारमंत्री पियुष गोयल यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. गेल्या नऊ महिन्यात देशाची निर्यात 300 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. तर डिसेंबर महिन्यात निर्यातीत 37 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाल्याची नोंद व्यापारमंत्र्यांनी केली. त्याचवेळी इंधन व सोने यांच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे आयात वाढली असून याने आयात-निर्यातीतील तफावत देखील वाढल्याचे समोर आले आहे.

देश चारशे अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठणार - केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयलआधीच्या वर्षाच्या तुलनेत 2021 सालच्या डिसेंबर महिन्यात निर्यातीत 37 टक्क्यांची वाढ झाली. डिसेंबर महिन्यातील निर्यात तब्बल 37 अब्ज डॉलर्स इतकी असून हा एका महिन्यात नोंदविण्यात आलेल्या निर्यातीचा उच्चांक ठरतो. देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्याबाबत स्वीकारलेल्या धोरणांना मिळालेला हा प्रतिसाद ठरतो, असा दावा व्यापारमंत्र्यांनी केला. इंजिनिअरिंग, वस्त्रोद्योग आणि रसायनाच्या उद्योगांनी केलेली चांगली कामगिरी या वाढलेल्या निर्यातीतून समोर येत आहे, असे व्यापारमंत्री पुढे म्हणाले.

भारताची व्यापारी निर्यात यावर्षी 400 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठणार असल्याचा दावा यावेळी गोयल यांनी केला. कोरोनाच्या साथीने जगातील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थांवरही परिणाम घडविला. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी पार पाडत आहे, याकडे व्यापारमंत्र्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, निर्यातीत मोठी वाढ झालेली असली तरी देशातील आयातही वाढत चालली आहे. कोरोनाच्या साथीमुळे घटलेली इंधनाची मागणी डिसेंबर महिन्यात प्रचंड प्रमाणात वाढली होती. यामुळे आयात व निर्यात यातील तफावात वाढल्याची बाब निदर्शनास आली आहे. इतकेच नाही तर सोन्याच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे याची निर्यातही वाढल्याचे दिसत आहे. यामुळे आयात व निर्यातीमध्ये लक्षणीय तफवात निर्माण झाल्याचे दिसते.

leave a reply