लादेनला शहीद म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका

इस्लामाबाद – ओसामा बिन लादेन ‘शहीद’ म्हणणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानातूनच जोरदार टीका होत आहे. नुकतेच अमेरिकन काँग्रेसच्या एका अहवालात पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचे हे विधान पाकिस्तानला अधिक अडचणीत आणणारे ठरेल. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हे विधान मागे घ्यायला हवे, नाहीतर पाकिस्तानची प्रतिमा आणखीच खराब होईल, असा सल्ला पाकिस्तानमधील विश्लेषक देत आहेत.

Pakistan-PMगुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या भाषणात इम्रान खान यांनी पाकिस्तानला मागील सरकारांच्या काळात लाजिरवाण्या प्रसंगांना कसे सामोरे जावे लागले, असे सांगताना अमेरिकेने २०१० साली पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये लादेनला ठार करण्यासाठी केलेल्या कारवाईचा उल्लेख केला. ”अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेन यांना शहीद केले. त्यानंतर साऱ्या जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली, पाकिस्तान बदनाम झाला. अमेरिकेसाठी ७० हजार पाकिस्तानींनी युद्धात आपले प्राण दिले. असे असताना आपलेच एक मित्र राष्ट्र पाकिस्तानात घुसून कारवाई करते आणि पाकिस्तानलाच याबद्दल काही कल्पना देत नाही.”, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

तसेच आधीच्या सरकारांनी केलेल्या चुका आपण सुधारल्या असून आता कोण पाकिस्तानला दुटप्पी म्हणत नाही, असा दावा त्यांनी केला. यापुढे पाकिस्तान कोणासाठी युद्धात सहभागी होणार नाही, तर केवळ शांती प्रक्रियेसाठी इतरांची साथ देईल, असे दावेही पाकिस्तानच्या पंप्रधानांनी ठोकले. अमेरिकेत ९/११ चा हल्ला घडविणारा, तसेच आपल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेद्वारे जगभरात दहशतवादी हल्ले करून हजारो जणांचे प्राण घेणाऱ्या लादेनचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेला आदरार्थी उल्लेख आणि दिलेला शहीद दर्जा पाकिस्तानचा दुटप्पीपणा सिद्ध करीत आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी आणि पाकिस्तानमधील विश्लेषकांनीही पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर यावरुन जोरदार टीका केली आहे. ”लादेनने आपला देश बरबाद केला आणि इम्रान खान त्यांना शहीद म्हणत आहेत, असा प्रश्न विरोधी पक्षनेते आणि माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत विचारला. तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी हिंसक कट्टरतावादाचे इम्रान एक प्रकारे समर्थन करीत असल्याची टीका केली आहे.

इम्रान खान यांचे हे विधान आपल्या देशाला, अधिकच अडचणीत आणणारे आणि पाकिस्तानची प्रतिमा अधिक खराब करणारे ठरेल, असे पाकिस्तानातील विश्लेषक म्हणत आहेत. इम्रान खान समर्थक चुकीने लादेनसाठी शहिद असा शब्द त्यांच्या तोंडून निघाला असावा, असे सांगत आहेत. मात्र इम्रान खान यांनी आपल्या भाषणात आदी ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या कारवाईत ठार झाला, असे म्हटले आणि मग चुकीची दुरुस्ती केल्याप्रमाणे शहीद असा उल्लेख केला, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. ही गोष्ट या देशांची मानसिकता दर्शवते असे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

leave a reply