‘डीआरडीओ’ने हैदराबादच्या दोन प्रयोगशाळांमध्ये ‘क्वांटम संपर्क’ प्रस्थापित केला

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून ‘डीआरडीओ’चे अभिनंदन

हैदराबाद – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हैदराबाद येथील आपल्या दोन प्रयोगशाळांमध्ये ‘क्वांटम की डिस्ट्रीब्युशन’ (क्यूकेडी) या तंत्रज्ञानाच्या आधारे संपर्क प्रस्थापित करून इतिहास घडविला आहे. त्याचवेळी ‘क्यूकेडी’द्वारे दोन प्रयोगशाळांमध्ये संपर्क प्रस्थापित झाल्यावर या संपर्काची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिसऱ्या पक्षाचा शोध लावणाऱ्या यंत्रणेचीही यावेळी चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘डीआरडीओ’चे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

‘क्यूकेडी’ हे सुरक्षित संपर्काचे आधुनिक तंत्रज्ञान असून भविष्यात लष्करी उपयोगासाठी, गोपनिय संपर्कासाठी याचा वापर होऊ शकतो. ‘क्रिप्टोग्राफीक प्रोटोकॉल’चा वापर करून संपर्काची ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ‘डीआरडीओ’च्या बंगळुरूतील ‘सेंटर फॉर आर्टिफीशिअल इंटेलिजन्स ॲण्ड रॉबोटिक्स’ (सीएआयआर) आणि मुंबईतील ‘डिफेन्स यंग सायंटिस्ट लॅबोरेटोरी-क्वांटम टेक्नॉलॉजी’ने (डीवायएसएल-क्यूटी) मिळून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे ‘सिक्रेट की’ बनवून संपर्क साधता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे होणारे संभाषण आणि माहितीचे आदानप्रदान गोपनिय राहू शकते.

हैदराबादच्या डीआडीओच्या दोन प्रयोगशाळा या ‘क्यूकेडी’ तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीरित्या एकमेकांशी जोडण्यात आल्या. ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलप्मेंट लॅबोरेटरी’ (डीआरडीएल) आणि रिसर्च सेंटर इमारत (आरसीए) या दोन प्रयोगशाळेत हा संपर्क प्रस्थापित करण्यात आला. या चाचणीत हे तंत्रज्ञान सर्व मापदंडात यशस्वी ठरल्याची माहिती समोर येत आहे. ही सुरक्षित संपर्क प्रणाली कोणीही भेदू शकत नाही. तसेच असे करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा शोध लावणाऱ्या तंत्रज्ञानाचीही यावेळी यशस्वी चाचणी घेण्यात आली.

‘डीआरडीओ’ने तयार केलेले हे तंत्रज्ञान भविष्यात माहिती व सूचना तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय महत्वाचे ठरणार आहे. सुरक्षादल, गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कासाठी ही यंत्रणा अतिशय महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे डीआरडीओला या चाचणीत मिळालेले यश अतिशय महत्वाचे मानले जात आहे. ‘डीआरडीओ’ने आणखी एक यशस्वी टप्पा याद्वारे ओलांडला आहे.

leave a reply