नवी दिल्ली/श्रीनगर – मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित असलेल्या सरपंचाची हत्या केली होती. यावर देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात माघारी परतण्यापासून रोखण्यासाठी दहशतवाद्यांनी ही हत्या केल्याचा विश्लेषकांचा दावा आहे. हत्या करण्यात आलेल्या सरपंचाच्या कुटुंबीयांनी आपण दहशतवाद्यांना घाबरणार नसून आपण काश्मीर सोडून कुठेही जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील लाकरीपुरा भागातील लूकबवान या गावचे सरपंच असलेल्या अजय पंडिता यांची त्यांच्या घराच्या बाहेर हत्या करण्यात आली होती. त्यांना काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून धमक्या मिळत होत्या. या धमक्यांची पर्वा न करता अजय पंडिता काम करीत होते. अजय पंडिता यांच्या हत्येची जबाबदारी ‘द रजिस्टेंस फ्रन्ट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
या हत्येवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अजय पंडिता यांची मुलगी शीना पंडिता यांनी आपले वडील हे छोट्याशा गावातील सरपंच होते. दहशतवाद्यांना त्यांना मारण्याची काय गरज होती, असा प्रश्न विचारून ते काश्मिरी पंडित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ”आपण दहशवाद्यांना भीत नाही, मला कोणाचीही भीती वाटत नाही. काश्मीर आमची मातृभूमी असून काश्मीरमध्ये परतण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही”, असे शीना यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी दाखविलेल्या या धैर्याचे देशभरात कौतुक होत आहे.
१९९० च्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या केल्या. प्रचंड अत्याचार केले. त्यामुळे हजारो काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून स्थलांतरण करावे लागले होते. आजही हजारो काश्मिरी कुटुंबीय निर्वासितांसारखे जगत आहेत. काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यावर काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये वसविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र वसाहती वसविण्याचाही प्रस्ताव आहे.
अजय पंडिता आणि त्यांचे कुटुंबीय १९९६ सालीच पुन्हा काश्मीरमध्ये परतले होते.धोकादायक वातावरणात राहण्यापेक्षा काश्मीर सोडून निघून जाऊ जावू, असे अजय पंडिता यांच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा त्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी वारंवार नकार दिला. इतकेच नाही त्यांनी गेल्यावर्षी सरपंच पदाची निवडणूकही लढवली. तसेच काश्मीर खोऱ्यात पुन्हा काश्मिरी पंडित परतावेत यासाठी अजय पंडिता प्रयत्न करीत होते. म्हणूनच अजय पंडिता यांची हत्या करण्यात आल्याचे दावे केले जात आहेत. निर्वासित काश्मिरी पंडितांना माघारी परतण्यापासून रोखण्याच्या कटाचा भाग म्हणून याकडे पहिले जात आहे. पंडिता यांच्या हत्येनंतर इथल्या सरपंचांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
सध्या जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले जात आहेत. यामुळे दुबळ्या बनलेल्या दहशतवादी संघटना सरपंचाची हत्या घडवून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिकांची हत्या घडविल्यामुळे दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षादलांना स्थानिकांकडून मिळणारे सहकार्य देखील वाढत आहे.
तसेच सध्या काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना आणि फुटीरांची अवस्था वाईट आहेत. दहशतवादी मोठ्या प्रमाणावर मारले जात आहेत. फुटीरांचे समर्थन घटले आहेत. या नैराशेतून दहशतवादी आता अशा हत्या घडवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा काही विश्लेषकांचा दावा आहे.