वॉशिंग्टन – इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी वेगाने पावले उचलणार्या बायडेन प्रशासनाला अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाने इशारा दिला. अमेरिकन कॉंग्रेसने तपासणी केल्याखेरी आणि त्यावरील मतदानाशिवाय इराणबरोबरचा अणुकरार अजिबात मान्य करणार नसल्याचे रिपब्लिकन पक्षाने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना बजावले. रिपब्लिकन पक्षाच्या ३३ सिनेटर्सनी बायडेन यांना पत्राद्वारे हा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी बायडेन यांच्या डेमोक्रॅट्स पक्षातील वरिष्ठ सिनेटरनी इराणबरोबरच्या अणुकराराला विरोध केला होता.
रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर टेड क्रुझ यांच्या नेतृत्वाखाली ३३ सिनेटर्सनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना पत्र लिहिले. अमेरिकन कॉंग्रेसच्या समोर यासंबंधी माहिती उघड केल्याशिवाय इराणसोबत अणुकरार केला तर हा करार उधळून लावण्यासाठी सर्व पर्यायांचा वापर केला जाईल, असे या पत्राद्वारे रिपब्लिकन सिनेटर्सनी बजावले. सदर पर्याय कोणते, याचे तपशील या सिनेटर्सनी उघड केले नसले तरी बायडेन प्रशासनाची कोंडी करण्याची तयारी रिपब्लिकन पक्षाने केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या अमेरिकन सिनेटमध्ये सत्ताधारी डेमोक्रॅट्स पक्षाचे ५० टक्के संख्याबळ आहे. त्यातच डेमोक्रॅट्स पक्षातूनच इराणबरोबरच्या अणुकराराला विरोध होत आहे. गेल्या आठवड्यात डेमोक्रॅटस पक्षाचे वरिष्ठ सिनेटर रॉबर्ट मेनेंडेस यांनीच बायडेन प्रशासनाने इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींवर प्रश्न उपस्थित केला होता. या अणुकराराने अमेरिकेला काय साध्य होणार आहे? इस्रायल आणि आखातातील मित्रदेशांची सुरक्षा अबाधित राहील का? इराण पुरस्कृत दहशतवाद कमी होईल का? असे जळजळीत प्रश्न सिनेटर मेनेंडेस यांनी विचारले होते.
बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार केला तर मेनेंटडेस यांच्याप्रमाणे डेमोक्रॅट्स पक्षातील काही सिनेटर देखील याच्याविरोधात उतरतील, अशी शक्यता अमेरिकन माध्यमे वर्तवित आहेत. तर पुढच्या काही महिन्यानंतर अमेरिकेत मध्यावधी निवडणूक होत आहे. बायडेन प्रशासनाच्या वर्षभराच्या कारभारावर अमेरिकन जनता वैतागली असून या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठे यश मिळेल असे दावे अमेरिकेतील प्रत्येक माध्यमे व विश्लेषक करीत आहेत. त्यानंतर २०२४ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही रिपब्लिकन पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, अशी चर्चा आहे.
असे झाल्यास रिपब्लिकन पक्ष बायडेन प्रशासनाने इराणबरोबर केलेला अणुकरार मोडीत निघेल, असे बोलले जाते.