तेजसच्या दुसर्‍या प्रकल्पाचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बंगळुरू – ‘तेजस’ लढाऊ विमानांच्या निर्मितीचा वेग दुपटीने वाढविण्यासाठी ‘हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड’ने (एचएएल) सुरू केलेल्या दुसर्‍या प्रकल्पाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या प्रकल्पामुळे ‘एचएएल’कडून वर्षाकाठी १६ तेजसची निर्मिती शक्य होईल. याचे स्वागत करून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पुढच्या काळात इतर देश देखील ‘तेजस’ची मागणी करतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी पुढच्या काही वर्षात संरक्षणक्षेत्रातील उत्पादनासाठी सुमारे १.७५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ध्येय सरकारसमोर असल्याचे यावेळी संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

१३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक मंत्रीगटाने सुमारे ८३ ‘तेजस’ विमानांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली होती. हा ४८ हजार कोटी रुपयांचा व्यवहार म्हणजे संरक्षणाच्या क्षेत्रात देशांतर्गत पातळीवर संरक्षणक्षेत्रात झालेला सर्वात मोठा व्यवहार ठरतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर, तेजसच्या निर्मितीसाठी आणखी एका प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये ३५ एकर जागेवर उभा करण्यात आलेल्या या प्रकल्पात तेजसची निर्मिती केली जाईल. यामुळे वर्षभरात एचएएलकडून वायुसेनेला १६ तेजसचा पुरवठा करणे शक्य होईल.

याआधी वायुसेनेने एचएएलला ४० तेजसची ऑर्डर दिलेली असून यापैकी काही विमाने वायुसेनेच्या ताफ्यात आलेली आहेत. आता ८३ विमानांच्या नव्या ऑर्डरनुसार २०२४ सालापासून तेजसचा पुरवठा सुरू होईल. पाच वर्षात ही मागणी पूर्ण केली जाईल. पण आम्ही तीन वर्षातच ही ऑर्डर पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे, असा विश्‍वास एचएएलचे अध्यक्ष आर. माधवन यांनी व्यक्त केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील एचएएल वेळेच्या आधीच ही ऑर्डर पूर्ण करील, असे म्हटले आहे.

संरक्षणाच्या आघाडीवर भारत दुसर्‍या देशांवर अवलंबून राहू शकत नाही. आत्मनिर्भर भारत अभियानानुसार देश आपल्या संरक्षणविषयक क्षमतेमध्ये अधिकाधिक वाढ करीत चालला आहे. या आघाडीवर एचएएलने फार मोठे योगदान दिलेले आहे, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एचएएलचे कौतुक केले. त्याचवेळी वायुसेनेकडून एचएएलला मिळालेले ४८ हजार कोटी रुपयांचे कंत्राट ही भारताच्या हवाई क्षेत्राला फार मोठे बळ देणारी ऐतिहासिक घटना असल्याचा दावा राजनाथ सिंग यांनी केला.

तेजस केवळ देशी बनावटीचे विमान नाही, तर आपल्या परदेशी स्पर्धक विमानांपेक्षा तेजस अनेक आघाड्यांवर सरस व माफक दरात तयार होणारे विमान आहे. यामुळे अनेक देशांनी तेजस खरेदी करण्यात स्वारस्य दाखविले आहे, अशी माहिती राजनाथ सिंग यांनी दिली. पुढच्या दोन वर्षात इतर देशांकडून तेजसची मागणी येईल, असा विश्‍वासही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, कोरोनाची साथ असताना देशासमोर आलेल्या संकटाचे रुपांतर संधी करण्यात आले आहे. या काळात इतर देशांच्या अर्थव्यवस्था वाईट स्थितीत असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र ११.५ टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे, याची आठवण राजनाथ सिंग यांनी करून दिली. एचएएलने देखील कोरोनाच्या साथीचा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ दिला नाही, ही फार मोठी बाब ठरते, अशा शब्दात संरक्षणमंत्र्यांनी एचएएलची प्रशंसा केली.

leave a reply