नवी दिल्ली – लडाखचा दौरा केल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सीमा भागाला भेट दिली. लडाखनंतर जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानच्या सीमाभागाचा दौरा करून संरक्षणमंत्र्यांनी चीन-पाकिस्तानला एकत्रित संदेश दिल्याचा दावा विश्लेषक करीत आहे. गलवानमधील संघर्षानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढला आहे. नियंत्रण रेषेजवळ केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या ‘बॉर्डर अॅक्शन टीम’कडून हल्ले होऊ शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केरन सेक्टरला भेट देऊन पाकिस्तानची कोणतीही आगळीक भारत खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
जगातील कोणतीही शक्ती भारताचा एक इंचही भूभाग बळकावू शकणार नाही,असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग शुक्रवारी आपल्या लडाख भेटीत दिला होता. यावेळी शस्त्र हातात घेऊन राजनाथ सिंग यांनी निशाणाही साधला होता. त्यांनी साधलेला हा निशाणा चीनला दिलेला संदेश ठरतो, असा दावा विश्लेषक करीत आहेत. लडाख दौऱ्यानंतर राजनाथ सिंग यांनी शनिवार अमरनाथला भेट दिली. त्यानंतर त्यांनी नियंत्रण रेषेचा दौरा केला. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरु असलेल्या केरन सेक्टरला भेट दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात चीन आणि पाकिस्तान सीमेवरील लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. त्याचबरोबर लष्करच्या दहशतवादविरोधी कारवाईची तयारीचीही पाहणी केली. एकाचवेळी चीन-पाकिस्तानसह दहशतवादविरोधात तयारीला भारतीय लष्कराने अडीच आघाड्यांवरील संघर्ष असे नाव दिले आहे आणि हा दौरा म्हणजे भारत यासाठी तयार असल्याचा संदेश देतो, असा दावा विश्लेषक करीत आहेत.
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लष्करप्रमुख नरवणे यांचा गेल्या काही दिवसातील हा चौथा काश्मीर दौरा आहे.